Tue, Apr 23, 2019 10:21होमपेज › Konkan › कोकण विभागात खासगी भागीदारी तत्वावर तयार होणार १३ हजार ७०० घरे

कोकण विभागात खासगी भागीदारी तत्वावर तयार होणार १३ हजार ७०० घरे

Published On: Jun 01 2018 2:06AM | Last Updated: May 31 2018 10:04PMमुंबई : योगेश जंगम 

प्रत्येक व्यक्‍तीला घर या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारने प्रधानमंत्री आवास योजनेला गती देण्याचे ठरवले आहे. यासाठी मुंबई महानगर प्रदेशात परवडणारी घरे बांधण्यात येणार आहेत. त्यासाठी सार्वजनिक खासगी भागीदारी तत्त्वावर (पीपीपी) परवडणारी घरे बांधण्याची योजना आहे. यासाठी कोकण विभागामध्ये सुमारे 13 हजार 700 घरांना मंजुरी देण्यात आली आहे. ‘म्हाडा’च्या कोकण विभागाने मागवलेल्या सातपैकी चार प्रस्तावांना मंजुरी मिळाली आहे. 

मुंबई प्रादेशिक क्षेत्र येथे असलेल्या जमिनींवर जमीन मालकांना ‘म्हाडा’च्या माध्यमातून प्रकल्प राबवता येणार आहे. ‘म्हाडा’च्या कोकण मंडळाकडे आलेल्या प्रस्तावांपैकी बदलापूर, खोपोली, डहाणू या भागांतील चार प्रस्तावांना मंजुरी देण्यात आल्याने या जागेवर सुमारे 13 हजार 700 घरे निर्माण होणार आहेत. ही सर्व घरे अत्यल्प आणि अल्प गटातील असणार आहेत. यासाठी जमीन मालकांना अडीच ‘एफएसआय’ देण्यात येणार आहे. या प्रकल्पामध्ये निर्माण होणार्‍या घरांमधील एक तृतियांश भाग मालकाला तर दोन तृतीयांश भाग ‘म्हाडा’ला मिळणार आहे.

‘म्हाडा’ ही घरे सोडतीद्वारे विकणार असून स्वस्त्यात घरे उपलब्ध करून देणार आहे. अशा प्रकल्पांमुळे खासगी विकासकांना स्पर्धा निर्माण होणार असून घरांच्या किमती कमी होण्यास मदत होणार आहे. या प्रकल्पाअंतर्गत भूखंडधारकांचा ‘म्हाडा’सोबत करार होणार आहे. या प्रकल्पामुळे जादा ‘एफएसआय’ मिळाल्याने त्या जागेवर जास्त घरे तयार होणार असल्याने जमीनदारांना एक तृतियांश घरे मिळणार आहेत. तसेच ‘म्हाडा’ला दोन तृतियांश घरे मिळणार असल्याने ही घरे सर्वसामान्यांसाठी लॉटरीद्वारे उपलब्ध होणार आहेत. 

कोकण विभागामध्ये पीपीपी तत्वावर घरे बांधण्यासाठी ‘म्हाडा’च्या कोकण मंडळाने दोन महिन्यांपूर्वीच प्रस्ताव मागवले होेते. त्यानुसार ‘म्हाडा’कडे सात प्रस्ताव आले होते. यातून चार प्रस्तावांना मान्यता मिळाली आहे. या चार ठिकाणी 13 हजार 700 घरे निर्माण होणार असून आणखीही प्रस्ताव ‘म्हाडा’कडे येण्याची शक्यता वर्तवण्यत येत आहे. यामुळे आणखी प्रस्ताव आले तर त्या प्रस्तावांची छाननी करून मंजुरी देण्यात येणार आहे. यामुळे आणखी मोठ्या प्रमाणावर घरे निर्माण होण्याची शक्यता व्यक्‍त करण्यात येत आहे. 

सर्वसामान्यांसाठी घरे तयार होणार

सार्वजनिक खासगी भागीदारी तत्त्वावर(पीपीपी) परवडणारी घरे बांधण्याच्या योजनेसाठी मागवण्यात आलेल्या प्रस्तावांपैकी चार प्रस्तावांना मंजुरी मिळाली आहे. यामुळे बदलापूर, खोपोली आणि डहाणू या भागांमध्ये सर्वसामान्यांसाठी अत्यल्प आणि अल्प गटांतील सुमारे 13 हजार 700 घरे तयार होतील.-विजय लहाने, मुख्य अधिकारी, कोकण विभाग, म्हाडा.