Mon, Apr 22, 2019 11:41होमपेज › Konkan › सिंधुदुर्गातील चराठे नं. १ प्राथमिक शाळेचा समावेश

राज्यातील १३ शाळांना ‘ओजस’ आंतरराष्ट्रीय शाळा म्हणून मान्यता

Published On: May 06 2018 1:09AM | Last Updated: May 06 2018 12:23AMकणकवली : प्रतिनिधी   

राज्यातील मुलांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे उत्तम शिक्षण देण्यासाठी राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, आदीवासी विकास विभाग व सामाजिक न्याय विभाग, शालेय शिक्षण विभाग यांच्यातर्फे चालविल्या जाणार्‍या शाळांमधून आंतरराष्ट्रीय शैक्षणिक दर्जाच्या शंभर शाळा निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात राज्यातील 13 आंतरराष्ट्रीय ओजस शाळांना मान्यता देण्यात आली आहे. त्यामध्ये सिंधुदुर्गातील जि. प. प्राथमिक शाळा चराठे नं. 1 (ता. सावंतवाडी) या शाळेचा समावेश आहे. 

आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळा तयार करण्यासाठी शाळा निवडीचे निकष निश्‍चित करण्यात आले आहेत. या संदर्भात राज्यातील शाळांना अर्ज सादर करण्यासाठी विद्या प्राधिकरण पुणेमार्फत ऑनलाईन लिंक देण्यात आली होती. 28 नोव्हेंबर 2017 अखेर एकूण 378 शाळांनी अर्ज केले होते. त्यामधून जिल्हास्तरीय निवड समिती द्वारे ऑनलाईन लिंक भरलेल्या शाळांमधून 109 शाळांची नामांकने प्राप्त झाली होती. त्यानंतर राज्यस्तरावर निवड प्रक्रिया घेण्यात आली होती.

या निवड परिषदेत सहभागी एकूण 106 शाळांमधून निवड प्रक्रियेत उत्कृष्ठ कामगिरी असलेली व रूब्रिक्स नुसार प्रत्येक विभागातून पात्र असणार्‍या शाळांची ओजस शाळा म्हणून शिफारस करण्यात आली. शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीने शिफारस केलेल्या 13 शाळांना पहिल्या टप्प्यात ओजस आंतरराष्ट्रीय शाळा म्हणून मान्यता देण्यात आली आहे. त्यामध्ये कोकणातील ठाणे आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यातील दोन शाळांचा समावेश करण्यात आला आहे. त्यात ठाणे जिल्ह्यातील जि. प. प्राथमिक शाळा खर्डी नं. 1 (ता. शहापूर) व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जि. प. प्राथमिक शाळा चराठे नं. 1 (ता. सावंतवाडी) या शाळेचा समावेश आहे. या शिवाय बुलढाणा, वाशिम, उस्मानाबाद, परभणी, चंद्रपूर, गोंदीया, नंदूरबार, नाशिक, कोल्हापूर, पुणे, सातारा या जिल्ह्यातील प्रत्येकी एका शाळेचा समावेश करण्यात आला आहे.