Tue, Apr 23, 2019 06:21होमपेज › Konkan › बारावी परीक्षा प्रवेशपत्रांवरुन घोळ

बारावी परीक्षा प्रवेशपत्रांवरुन घोळ

Published On: Feb 20 2018 1:17AM | Last Updated: Feb 19 2018 10:19PMरत्नागिरी : प्रतिनिधी

महाराष्ट राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून घेतल्या जाणार्‍या  बारावी परीक्षेच्या प्रवेशपत्रांचे वाटप विद्यार्थ्यांना करण्यात आले आहे. या प्रवेशपत्रांवर केवळ परीक्षेच्या मुख्य केंद्राचाच उल्लेख आहे. मात्र, त्या केंद्रांतर्गत असलेल्या उपकेंद्रावर जर बैठक व्यवस्था करण्यात आली असेल तर तसा उल्लेखच प्रवेशपत्रावर करण्यात आलेला नसल्याने विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला आहे.

राज्य मंडळाकडून घेतली जाणारी बारावीची परीक्षा येत्या 21 फेब्रुवारीपासून होणार आहे. राज्यभरातून 14 ते 15 लाख विद्यार्थी बारावीची परीक्षा देत आहेत. विद्यार्थ्यांना त्यांच्या कनिष्ठ महाविद्यालयांकडून नुकतेच प्रवेशपत्रांचे वाटप करण्यात आले आहे. त्यामध्ये जर विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था मुख्य केंद्राऐवजी उपकेंद्रावर झाली असेल तर त्याची माहिती प्रवेशपत्रावर देणे आवश्यक होते. मात्र, ती देण्यात आलेली नाही. त्यामुळे संबंधित परीक्षा केंद्रात जाऊन माहिती घेतल्यानंतरच विद्यार्थ्यांना त्यांचा नंबर कुठे आला आहे, याची माहिती मिळत आहे. 

बारावीच्या विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र मिळाल्यानंतर काही विद्यार्थ्यांनी त्यांच्या प्रवेशपत्रावर असलेल्या परीक्षा केंद्रात जाऊन बैठक व्यवस्थेची माहिती घेतली. त्यावेळी त्यांची बैठक व्यवस्था या महाविद्यालयात नसून उपकेंद्र असलेल्या दुसर्‍या महाविद्यालयात करण्यात आल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यानुसार त्यांनी त्यांच्या इतर मित्र-मैत्रिणींनाही याची माहिती दिली. मात्र, प्रवेश असलेल्या महाविद्यालयाचे नाव वेगळे व प्रत्यक्षात असलेले महाविद्यालय वेगळे यामुळे त्यांचा गोंधळ उडताना दिसत आहे.

दरम्यान, या पार्श्‍वभूमीवर विद्यार्थ्यांनी त्या परीक्षा केंद्रात जाऊन त्यांची बैठकव्यवस्था नेमकी कुठे झाली आहे याची माहिती घ्यावी, उपकेंद्र असलेल्या दुसर्‍या महाविद्यालयां मध्ये त्यांची बैठकव्यवस्था करण्यात आलेली असू शकते, अशी माहिती काही  महाविद्यालयांनी बारावीच्या विद्यार्थ्यांना दिली आहे. त्यांचे परीक्षेचे मुख्य केंद्र व त्याची उपकेंद्र असलेली महाविद्यालये याची माहिती दिली आहे. मात्र, ज्या महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना व्यवस्थित माहिती दिली नाही, तिथल्या विद्यार्थ्यांचा मात्र चांगलाच गोंधळ उडतो आहे.

परीक्षेला उशिराआल्यास प्रवेश नाही

दहावी-बारावीच्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिका व्हॉट्सअ‍ॅपवरून फुटू लागल्याच्या पार्श्‍वभूमीवर विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या वेळेपूर्वी अर्धा तास अगोदर परीक्षा केंद्रात उपस्थित राहणे बंधनकारक आहे. परीक्षा केंद्रात येण्यास उशीर झाल्यास त्यांना प्रवेश दिला जाणार नाही, असे यापूर्वीच राज्य मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी थेट परीक्षेच्या दिवशी केंद्रावर न जाता त्या पूर्वीच बैठकव्यवस्थेची माहिती घ्यावी, असे कळवण्यात आले आहे.