Fri, Jul 19, 2019 05:34होमपेज › Konkan › जिल्ह्यात अडीच वर्षांत 123 सायबर क्राईम!

जिल्ह्यात अडीच वर्षांत 123 सायबर क्राईम!

Published On: Aug 10 2018 11:57PM | Last Updated: Aug 10 2018 11:23PMरत्नागिरी : राजेश चव्हाण

मी बँकेतून मॅनेजर बोलतोय..., तुम्हाला लॉटरी लागलीय..., तुम्ही स्कीममध्ये बक्षीस जिंकलंय.., यासारखे असंख्य कॉल अनेकदा मोबाईलवर येतात. काहीवेळा अशा कॉलला भुलून आपण माहिती देतो आणि काही मिनिटांतच आपल्या बँक बॅलन्सचा सफाया होतो. गेल्या अडीच वर्षांत रत्नागिरी जिल्ह्यात सायबर क्राईमचे तब्बल 123 गुन्हे दाखल झाले आहेत. त्यातही आर्थिक फसवणुकीचे तब्बल 90 गुन्हे दाखल झाले असून, विशेष म्हणजेे अवघ्या दोनच गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. 

इंटरनेटकडे माहितीचे मायाजाळ म्हणून पाहिले जाते. एका क्‍लिकवर जगभरातील माहिती घरबसल्या उपलब्ध होते. जेवढा चांगला वापर आहे तेवढाच त्याचा गैरवापर करणारे महाभागही कमी नाहीत. गेल्या काही वर्षांत सायबर क्राईमचे (संगणकीय गुन्हे) प्रमाण वाढले आहे. बदनामीच्या गुन्ह्यांबरोबर आथिर्र्क फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये सातत्याने वाढ होत आहे.

विशेषत: मोबाईलवरून फोन करून मी ब्रँच मॅनेजर बोलतोय, तुमचे एटीएम बंद होणार आहे, असे सांगून पिन  मागितला जातो किंवा एटीएमची संपूर्ण माहिती समोरील व्यक्‍तीला दिली जाते. त्यानंतर काही क्षणातच बँक खाते रिकामे होते. अशाच पद्धतीने लॉटरी लागली आहे, बक्षीस लागले असून काही रक्‍कम भरल्यावर तुमच्या खात्यात रक्‍कम ट्रान्स्फर केली जाईल, असे सांगून फसवणूक होते. चिपळुणातील एका व्यक्‍तीला तर आलिशान कार बक्षीस लागली असून, पासिंग व आरटीओ शुल्क भरायचे आहे सांगून लाखो रुपयांना गंडा घातला होता. सायबर गुन्हेगारांनी अशिक्षितांनाच नाही

तर सुशिक्षितांनाही आपल्या गळाला लावले आहे. डॉक्टर, इंजिनिअर अशी उच्च विद्याविभूषीत मंडळीही सायबर गुन्हेगारांच्या भुलथापांना बळी पडली आहेत.  टीव्ही, अगदी बँकांमध्येही एटीएमबाबत कुणाला माहिती देऊ नका, बँकेतून अशा पद्धतीने माहिती विचारली जात नाही, अशी जागृतीही करण्यात येते. मात्र, जाहिरातबाजी होऊनही  याबाबत ‘पालथ्या घड्यावर पाणी’ अशीच स्थिती राहिल्याने सायबर गुन्हेगारांच्या आमिषाला अनेकजण बळी पडत आहेत.

सायबर गुन्हेगार एक गुन्हा केल्यानंतर मोबाईल सीमकार्ड फेकून दिले जाते. या सीमचा पुनर्वापर चुकून केला जातो. त्यामुळे पोलिस तपासासही मर्यादा पडतात.  सीमबाबतची माहिती मिळाल्यास, संबंधित व्यक्‍तीची माहिती चुकीची असते. अशा गुन्ह्यासाठी चोरीचा मोबाईलही वापरला जातो. त्यामुळे गुन्हेगारांचा माग काढण्यात पोलिस यंत्रणेलाही मर्यादा पडतात. जिल्ह्यातील पूर्णगड पोलिसांनी नुकतेच बिहारमधून एका सायबर गुन्हेगाराला जेरबंद केले. त्यामुळे या गुन्हेगारांच्या कार्यपद्धतीवर प्रकाश पडणार आहे.

सायबर गुन्ह्यांमध्ये हॅकिंग, सायबर स्टॉकिंग, व्हायरस डेसिमिनेशन, सॉफ्टवेअर पायरसी, नेट एक्स्ट्रॉशन, क्रेडिट कार्ड फ्रॉड, चाईल्ड पॉर्नोग्राफी, ट्रोजन अ‍ॅटॅक, ई मेल बॉबिंग, मालवेअर, ई मेल स्पॅमिंग, जॉब स्कॅम, इलेक्ट्रॉनिक्स मनी लँडरिंग, स्किमिंग या सारख्या गुन्ह्यांचा समावेश होतो.

व्हॉटस् अ‍ॅप, एफ.बी.वर बदनामी; 33 गुन्हे
व्हॉटस् अ‍ॅप, फेसबुक व अन्य सोशल मीडियावर महिलांची बदनामी, समाजात तेढ निर्माण करणार्‍या पोस्ट व्हायरल करणार्‍यांविरुद्ध 33 गुन्हे दाखल असून, तब्बल 35 जणांना पोलिसांनी अटक केली आहे.