Fri, Jan 24, 2020 23:48होमपेज › Konkan › सागरमाला’साठी १२० कोटी

सागरमाला’साठी १२० कोटी

Published On: Dec 18 2017 2:35AM | Last Updated: Dec 17 2017 8:46PM

बुकमार्क करा

आरवली : जाकीर शेकासन

केंद्र शासनाच्या सागरमाला योजनेंतर्गत बंदरे जोडण्याचा कोकणातील पहिला प्रकल्प मंजूर झाला असून, यासाठी 120 कोटी रुपये खर्च येणार आहे. नुकतेच या प्रकल्पाचे बंदर विकास विभागाकडून करजुवे ते कोंडिवरे, कळंबुशी असे सर्वेक्षण करण्यात आले. 

या प्रकल्पांतर्गत कुरधुंडा, करजुवे, माखजन, बुरंबाड आणि कोंडिवरे कळुंबुशी येथे बोट टर्मिनस बांधण्यात येणार असून  हा भाग पर्यटनाच्यादृष्टीने विकसित करण्यात येणार आहे.

इतिहासजमा झालेली ही बंदरे विकसित

हा प्रकल्प लवकरच पूर्णत्वास जावा, यासाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष बाळ माने व भाजपच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या उल्का विश्‍वासराव प्रयत्न करीत आहेत. पन्नास ते साठ वर्षांपूर्वी जयगड खाडीत गलबतांद्वारे माल वाहतूक सुरू होती. संगमेश्‍वर - नावडी, कुरधुंडा व माखजन येथे बंदरे होती. या बंदरांतून कोल्हापूर, मलकापूर आदी ठिकाणी मालवाहतूक होत असे. मंगलोरहून कौले या बंदरात बोटीने यायची. आता ही बंदरे इतिहासजमा झाली आहेत. छ. शिवाजी महाराज यांच्या आरमारातील नौका संगमेश्‍वरजवळील निढळेवाडी येथे बनविण्यात येत असत. हाच इतिहास डोळ्यासमोर ठेवत पुन्हा एकदा इतिहासजमा झालेली ही बंदरे विकसित करून संगमेश्‍वर, रत्नागिरी, गुहागर आणि चिपळूण तालुक्यातील खाडीलगत असणारी गावे पर्यटनाच्या दृष्टीने विकसित करण्याचा केंद्र शासनाचा मानस आहे.

जयगड-करजुवे खाडीही संगमेश्‍वरसह रत्नागिरी, गुहागर आणि चिपळूण तालुक्यात विखुरलेली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे नद्यांचा विकास या खात्याचा अतिरिक्त कारभार सोपविल्यावर ना. गडकरी यांनी कोकणातील या पहिल्याच प्रकल्पाला हिरवा कंदील दाखविला आहे. 

हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्र शासनाकडून पन्नास टक्के व राज्य शासनाकडून 50 टक्के निधी मिळणार आहे. शनिवारी करजुवे खाडीत बंदर विकास खात्याकडून सर्वेक्षण करण्यात आले. कुरधुंडा, नावडी, फुणगूस, करजुवे, माखजन, कोंडिवरे, आरवली तसेच गुहागर तालुक्यातील काजुर्ली, चिपळूण तालुक्यातील वीर या भागातील खाडीमधील गाळउपसा करण्यात येणार असून ठिकठिकाणी बोट टर्मिनस बांधण्यात येणार आहेत. संभाव्य महामार्गाचे चौपदरीकरण तसेच आरवली, संगमेश्‍वर रेल्वे स्थानकाशी कनेक्टिव्हीटी होईल, असे हे बोट टर्मिनस बांधण्यात येणार आहेत. पर्यटकांना सोयीचे व्हावे याचा विचार करून कोंडीवरे-कळंबुशी, बुरंबाड, माखजन, धामापूर, करजुवे येथे बोट टर्मिनस बांधण्यात येणार आहेत.

सागरमाला योजनेंतर्गत पर्यटनाच्यादृष्टीने वॉटर स्पोर्टस्, बोटींगसारखे व्यवसाय सुरू करण्यात येणार आहेत. सर्वेक्षणप्रसंगी पंचायत समिती सदस्य सुभाष नलावडे, माजी उपसभापती संतोष डावल, बावा चव्हाण, राकेश जाधव, शैलू घामणसकर, समीर पाटणकर, प्रशांत विचारे, करजुवेचे उपसरपंच श्रीकांत नलावडे, प्रशांत रानडे, सतीश चव्हाण, बंदर विकास खात्याचे मुख्य कार्य. अभियंता सुधीर देवरे, सहाय्यक अभियंता डी. एस. मंजुळे, शाखा अभियंता पी. डी. शिंदे, सहाय्यक बंदर निरीक्षक एच. व्ही. मुल्ला, स्ट्रपचे कन्सल्टंट राजाराम राव उपस्थित होते.