Wed, Nov 21, 2018 12:15होमपेज › Konkan › खेडमध्ये 12 प्राथमिक शाळा धोकादायक

खेडमध्ये 12 प्राथमिक शाळा धोकादायक

Published On: Jun 19 2018 10:47PM | Last Updated: Jun 19 2018 8:48PMखेड : प्रतिनिधी

तालुक्यातील जि. प. मराठी शाळांच्या बारा इमारती धोकादायक बनल्या आहेत. यामुळे या वर्षी विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन शिक्षण घ्यावे लागणार आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून या शाळांची दुरूस्ती लाल फितीत अडकली असून दुरूस्तीसाठी निधी उपलब्ध झालेला नाही.

तालुक्यात 373 प्राथमिक शाळा आहेत. त्यातील अनेक इमारती धोकादायक झाल्या आहेत. अनेक शाळांची कौले नादुरूस्त झाली आहेत.  या शाळेचे छप्पर कोसळण्याच्या स्थितीत आहे. अनेकवेळा शाळा दुरूस्तीचे प्रस्ताव पाठविण्यात आले. पंचायत समिती शिक्षण विभागाने व बांधकाम खात्याने दुरूस्तीचे अंदाजपत्रक देखील पाठविले. मात्र, या शाळांच्या दुरूस्तीसाठी निधीच उपलब्ध झालेला नाही. त्यामुळे तालुक्यातील बारा शाळा धोकादायक बनल्या आहेत. यावर्षी या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना कसे बसवायचे हा प्रश्‍न उपस्थित होत असून विद्यार्थ्यांना शाळेमध्ये बसवायचे कसे असा प्रश्‍न तेथील पालक आणि शिक्षकांपुढे निर्माण झाला आहे.

या शाळांमध्ये तालुक्यातील आंबवली, धामणंद पाथरेवाडी, पोयनार पाटीलवाडी, जामगे कदमवाडी क्र. 1, भोस्ते क्र. 1, भेलसई गंगवाडी, आंबये पाटीलवाडी, चिंचवली शिंगरवाडी, कशेडी खोतवाडी, बिजघर क्र. 1, सवेणी, बहिरवली कुणबीवाडी, पन्हाळजे पाटीलवाडी या शाळांच्या इमारती नादुरूस्त आहेत. त्यामुळे यंदा येथील विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन धडे गिरवावे लागणार आहेत. संबंधित शाळा व्यवस्थापन समिती, सरपंच, मुख्याध्यापक यांनी या शाळा दुरूस्तीबाबत वारंवार खेड पं. स. शिक्षण विभागाकडे मागणी केलेली आहे. या शिवाय स्थानिक जि. प. व पं. स. सदस्य यांचाही पाठपुरावा सुरू आहे. परंतु निधी उपलब्ध न झाल्याने या इमारतीची दुरूस्ती झालेली नाही.