Fri, May 24, 2019 08:26होमपेज › Konkan › संगमेश्‍वरातील १२ ग्रामपंचायत उमेदवारांची अपात्रता कायम

संगमेश्‍वरातील १२ ग्रामपंचायत उमेदवारांची अपात्रता कायम

Published On: Jun 04 2018 1:05AM | Last Updated: Jun 03 2018 8:58PMदेवरूख :वार्ताहर

संगमेश्‍वर तालुक्यात तीन वर्षांपूर्वी झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतील विजयी उमेदवारांनी खर्च वेळेत सादर न केल्यामुळे  जिल्हाधिकार्‍यांनी या उमेदवारांना अपात्र ठरवले होते. यावर उमेदवारांनी  अप्पर आयुक्त, कोकण विभागाकडे अपिल केले होते. सुनावणीत जिल्हाधिकार्‍यांचा आदेश ग्राह्य धरण्यात आला आहे. यामुळे 7 ग्रामपंचायतीतील 12 उमेदवार अपात्र ठरले आहेत.

निवडणुकीचा निकाल लागल्यापासून उमेदवारांनी तीन महिन्याच्या आत निवडणुकीचा खर्च सादर करावा, असा निवडणूक विभागाचा नियम आहे. या नियमांना बगल देणार्‍या उमेदवारांना थेट अपात्र ठरविण्यात येते. तालुक्यात सन 2015 मध्ये ग्रा. पं. च्या निवडणुका पार पडल्या. यातील विजयी उमेदवारांनी खर्च वेळेत सादर न केल्यामुळे जिल्हाधिकार्‍यांनी या उमेदवारांना थेट अपात्र ठरवत दणका दिला होता.

या वर दाद मागण्यासाठी या उमेदवारांनी अप्पर आयुक्त कोकण विभागात अपिल सादर केले होते. या अपिलाची सुनावली नुकतीच करण्यात आली आहे. आयुक्तांनी देखील जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाला दुजोरा देत उमेदवारांना अपात्र ठरवले आहे.

अपात्र ठरलेल्या उमेदवारांमध्ये अजय सुवारे, निशा बोथले (नांदळज), वैशाली रेवाळे (कोसुंब), विवेक वीरकर (नारडुवे), संजय सुर्वे (आंबेड खुर्द), स्वप्नाली माटल, सुनंदा दुदम, संगीता राजाराम दुदम, वसंत मेस्त्री, विजय मेस्त्री (परचुरी), सुरेश राजाराम चाळके (चाफवली), सुप्रिया पवार (कारभाटले) यांचा समावेश आहे.

दरम्यान, हे सर्व उमेदवार अपात्र ठरलेल्यामुळे  ग्रा. पं. मधील जागा पुन्हा रिक्त राहणार आहेत. यात परचुरी ग्रा. पं. मधील सर्वाधिक उमेदवार अपात्र ठरले आहेत. यामुळे या ग्रामपंचायतीवर वर प्रशासक नेमून कारभार चालवण्याची वेळ येणार आहे.