Mon, Jan 27, 2020 12:38होमपेज › Konkan › हत्ती नुकसानीपोटी 1127 लाभार्थ्यांना दिली 4 लाखांची नुकसानभरपाई

हत्ती नुकसानीपोटी 1127 लाभार्थ्यांना दिली 4 लाखांची नुकसानभरपाई

Published On: Jun 04 2019 1:31AM | Last Updated: Jun 03 2019 11:04PM
ओरोस : प्रतिनिधी

जिल्ह्यात दोडामार्ग तालुक्यात हत्तींचा मोठ्या प्रमाणात वावर आहे. या हत्तींकडून शेती बागायतींचे नुकसान होत आहे. या नुकसानीपोटी आतापर्यंत 1127 लाभार्थ्यांना मिळून  4 लाखांची नुकसान भरपाई दिली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे व जिल्हा उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांनी दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सद्यस्थितीत 9 हत्तींचा वावर असल्याचे श्री.चव्हाण यांनी सांगितले. 

जिल्हास्तरीय लोकशाही दिनानंतर आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. पांढरपट्टे व श्री. चव्हाण बोलत होते. जि.प.चे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हरिष जगताप, उपमुख्यकार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे आदी उपस्थित होते. माणगांव भागात यापूर्वी पकडण्यात आलेल्या हत्तीचे कर्नाटक येथे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. सध्या त्याच्यावर राज्य शासनाकडून प्रतिदिन 15 हजार रुपये एवढा खर्च करण्यात येत आहे. आता या हत्तीला तसेच अन्य दोन हत्तींना ताडोबा अभयारण्यात पर्यटक सवारीसाठी पाठविण्यात येणार आहे. दोडामार्ग तालुक्यातील हत्ती हटाव मोहिमेबाबत अद्याप कुठलेही आदेश प्राप्त नसल्याचे डॉ. पांढरपट्टे यांनी सांगितले. 

शासनाच्या शतकोटी वृक्ष लागवड अभियानांतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्याला यावर्षी 41 लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यामध्ये वनविभागाला 8 लाख 7 हजार, सामाजिक वनीकरण विभाग 10 लाख, ग्रा.पं. 13 लाख 73 हजार, कृषि विभाग 5 लाख 44 हजार व अन्य विभागांना 4 लाख 86 हजार असे हे उद्दिष्ट असल्याचे डॉ. पांढरपट्टे यांनी सांगितले.  या वृक्ष लागवडीचे नियोजन पूर्ण झाले असून यासाठी आतापर्यंत 1 8 लाख खड्डे मारून पूर्ण झाले आहेत, अशी माहिती समाधान चव्हाण यांनी दिली.  या अभियानांतर्गत राष्ट्रीय महामार्ग तसेच राज्य, जि.प. व सा.बां. विभागाकडील रस्त्यांच्या दुतर्फा वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. दरम्यान, राष्ट्रीय महामार्ग दुतर्फा वृक्ष लागवडीसाठी महामार्ग प्राधिकरणने 2 कोटी 50 लाख रू. एवढ्या निधीची मागणी केली आहे. वृक्ष लागवड मोहिमेत 1 जुलैपासून प्रारंभ होणार असून या अंतर्गत प्राधान्याने आंबा, काजू, साग, बांबू, कोकम, वडी, पिंपळ तसेच अन्य औषधी वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. अनधिकृत वाळू उत्खननाविरोधात सर्वत्र कारवाई सुरू असून आतापर्यंत अनेक वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आल्याचे डॉ. पांढरपट्टे म्हणाले.  महामार्ग चौपदरीकरण कामाअंतर्गत अनेक ठिकाणी समस्या निर्माण झाल्या आहेत. अर्धवट सर्व्हीस रोड, अर्धवट बॉक्सवेल, गटारांची अपूर्ण कामे यामुळे पावसाळ्यात अनेक समस्या निर्माण होण्याची भीती आहे. याबाबत महामार्ग प्राधिकरणचे अधिकारी, जिल्हा प्रशासनाचे अधिकारी व ठेकेदार कंपान्यांचे अधिकारी यांची संयुक्‍त बैठक तातडीने बोलविली असल्याची माहिती जिल्हाधिकार्‍यांनी दिली.