Sun, Jul 21, 2019 07:50होमपेज › Konkan › पावसाळी साथरोग नियंत्रणासाठी 11 आरोग्य पथके

पावसाळी साथरोग नियंत्रणासाठी 11 आरोग्य पथके

Published On: Jun 08 2018 1:22AM | Last Updated: Jun 07 2018 10:14PMकुडाळ ः प्रतिनिधी

पावसाळी मोसमात जिल्ह्यातील जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी जिल्हा आरोग्य विभागाने 11 ठिकाणी पथके स्थापन केली आहेत.  3 अ‍ॅडव्हान्स लाईफ सपोर्ट व 9 बेसिक लाईफ सपोर्ट अशा एकूण 12 अ‍ॅब्युलन्स सज्ज ठेवण्यात आल्या असल्याची माहिती नवनियुक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय चाकोरकर यांनी दिली.

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एस. व्ही. कुलकर्णी यांची धुळे येथे बदली झाल्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सकपदी तुुळजापूर येथून डॉ. धनंजय चाकोरकर यांनी दोन दिवसापूर्वी पदाचा कार्यभार स्वीकारला. पावसाळी मौसमच्या पार्श्‍वभूमीवर अत्यावश्यक औषधांचा साठा किती आहे? याची  माहिती घेतली असून आवश्यक औषधांकरिता पत्रव्यवहार करण्याच्या सूचना संबंधित विभागांना दिल्या असल्याचे डॉ. चाकोरकर यांनी सांगितले. पावसाळी मोसमाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी आणि आरोग्य विभागाच्या समन्वयकाची बैठक झाली असून आरोग्य विभागाने समित्या गठीत केल्या आहेत. ग्रामीण विभागासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी तर  शहरी विभागासाठी जिल्हा शल्यचिकित्सक विभागाकडून  कार्यवाही केली जाणार आहे. 

जिल्ह्यात तीन अ‍ॅडव्हान्स लाईफ सपोर्ट व नऊ बेसिक लाईफ सपोर्ट अशा 12 अ‍ॅम्ब्युलन्स जिल्हावासीयांसाठी तैनात ठेवण्यात आल्या आहेत. औषधाचाही साठा पुढील तीन महिने पुरेल असा ठेवण्यात आला आहे. लेप्टो स्पायरोसिसच्या शक्यतेने आधीच आवश्यक त्या गोळ्याची उपलब्धता करून ठेवण्यात आली आहे. एकूणच जिल्ह्यात रूग्णांना औषधाचा  तुटवडा कमी पडणार नाही यासाठी आरोग्य विभागाने आवश्यक ती खबरदारी  घेतली आहे. वैद्यकीय अधिकारी व स्टाफची कमतरता आहे, तरीदेखील उपलब्ध स्टाफच्या माध्यमातून सर्व टिमला सोबत घेवून रूग्णांना चांगली सेवा देण्याचा आपला प्रामाणिक प्रयत्न राहणार असल्याचे डॉ. चाकोरकर यांनी सांगितले.