Mon, Jul 15, 2019 23:54होमपेज › Konkan › दोडामार्ग तालुक्यात बंद १०० टक्के यशस्वी

दोडामार्ग तालुक्यात बंद १०० टक्के यशस्वी

Published On: Jul 27 2018 1:25AM | Last Updated: Jul 26 2018 10:42PMदोडामार्ग : प्रतिनिधी

दोडामार्ग तालुक्यात गुरुवारी सकल मराठा समाज बांधवांनी पुकारलेल्या बंदला तालुकावासियांनी बाजारपेठा बंद ठेवून पाठिंबा दर्शविला.  मराठा बांधवांनी आरक्षण समर्थनाथ घोषणा देत  शहरातील गांधी चौकात ठिय्या आंदोलन केले. तसेच चौक ते तहसीलदार कार्यालय असा अश्‍वारूढ मोर्चा काढण्यात आला. सर्व रस्ता मार्गावर अज्ञातांनी झाडे तोडून टाकल्याने वाहतूक पूर्णतः थांबली होती. यामुळे एसटीच्या ग्रामीण जाणार्‍या 25 फेर्‍या रद्द झाल्या होत्या. संध्याकाळी उशिरापर्यंत रस्त्यावरील झाडे जशीच्या तशी रस्त्यावर राहिल्याने अनेक वाहने अडकून पडली होती.

दोडामार्ग तालुकाध्यक्ष अ‍ॅड.सोनू गवस यांनी मनोगत व्यक्‍त करत आपले आंदोलन शांततेने सुरू आहे. आपला लढा याच मार्गाने सुरू ठेवुया. आपल्या हक्‍काचे आरक्षण मिळण्यासाठी आणि शासनाला जागे करण्यासाठी आपली आंदोलने सुरुच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

गुरुवारी दोडामार्ग, साटेली-भेडशी या दोन्ही बाजारपेठा व्यापार्‍यांनी बंद ठेवल्या होत्या. यांमुळे बाजारपेठात शुकशुकाट जाणवत होता. बुधवारी मध्यरात्री दोडामार्ग-तिलारी, आयी, विजघर, दोडामार्ग, बांदा या प्रमुख महामार्गावरअज्ञातांनी झाडे कटरच्या सहाय्याने तोडून टाकल्याने गुरुवारी पहाटेपासून वाहतूक व्यवस्था ठप्प झाली होती. ग्रामीण भागात गेलेल्या वस्तीच्या एसटी  गावातच अडकून पडल्या होत्या.

येथील सिद्धीविनायक मंदिरात सकाळी 11 वा. सकल मराठा बांधव एकत्रित आले. यानंतर विजय मोहीते यांनी आपला आणलेल्या अश्‍वावर बसून यांच्या सोबत बांधवांनी भव्य मोर्चा काढत घोषणा देत गांधी चौकात ठिय्या आंदोलन करून मार्ग रोखून धरला.  तहसीलदार कार्यालयापर्यंत मोर्चा नेत, उपस्थित प्रभारी तहसीलदार एस.डी.कर्पे यांना शासनापर्यंत आमच्या मराठा समाज बांधवांच्या भावना पोहोचवा, असे  निवेदन बांधवांनी दिले. दोडामार्ग तालुक्यातील व्यापार्‍यांनी बाजारपेठा बंद ठेवून तसेच व्यापारी संघटना, मुस्लिम महासंघ, चालक-मालक संघटना यांनी जाहीर पाठिंबा दर्शविला. दीपक गवस यांनी गांधी चौकात शिववंदना सादर करून उपस्थित मराठा बांधवांत चैतना जागृत केली.