Fri, Aug 23, 2019 21:05होमपेज › Konkan › मुंबई-गोवा महामार्गावरून अवजड वाहतुकीला १० दिवस ‘ब्रेक’

मुंबई-गोवा महामार्गावरून अवजड वाहतुकीला १० दिवस ‘ब्रेक’

Published On: Sep 09 2018 2:12AM | Last Updated: Sep 08 2018 10:32PMरत्नागिरी : प्रतिनिधी    

गणेशोत्सवाच्या कालावधीत मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी किंवा अपघात होऊ नये, यासाठी परिवहन विभागातर्फे आदेश जारी करण्यात आले असून, दहा दिवस अवजड वाहतूक बंद ठेवली जाणार आहे.

मुंबई-गोवा महामार्गावर पनवेल ते इन्सुली (सावंतवाडी) दरम्यान पेण, वडखळ, नागोठणे, कोलाड, इंदापूर, महाड, खेड, चिपळूण, संगमेश्‍वर, राजापूर, काकवली, कुडाळ, सावंतवाडीवरून होणारी वाळू भरलेले ट्रक, मोठे ट्रेलर व 16 टन किंवा 16 टनांपेक्षा अधिक क्षमतेची मल्टी एक्सल, ट्रेलर आदी वाहनांची वाहतूक पूर्णत: बंद राहणार आहे. गणेशोत्सवाच्या सुरुवातीला 8 सप्टेंबरपासून बंदी आदेश जारी करण्यात आले आहेत. दि. 8 ते 9 सप्टेंबरपर्यंत रात्री 8 वा. पर्यंत व त्यानंतर 10 सप्टेंबर रोजी रात्री 8 वा. पासून ते दि.13 सप्टेंबर रोजी रात्री 8 वा.पर्यंत अवजड वाहतूक बंद ठेवली जाणार आहे. त्यानंतर गणेश विसर्जनाच्या दिवशी दि. 17 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वा. पासून 20 सप्टेंबर रोजी रात्री 8 वा. पर्यंत तर अनंत चतुदर्शीच्या दिवशी दि.23 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वा. पासून ते 24 सप्टेंबर रोजी रात्री 8 वा. पर्यंत अवजड वाहतूक बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे 11 सप्टेंबर रोजी मध्यरात्री 1 वा. पासून 24 सप्टेंबर रोजी रात्री 8 वा. पर्यंत वाळू व तत्सम गौण खनिजांची वाहतूक बंद ठेवण्याचा आदेश जारी करण्यात आला आहे.

जीवनावश्यक वस्तूंना वगळले

दूध, पेट्रोल, डिझेल, स्वयंपाक गॅस सिलेंडर, लिक्‍विड मेडिकल ऑक्सिजन व भाजीपाला वाहतूक करणार्‍या वाहनांना हे बंदी आदेश लागू राहणार नसल्याचे शासनाचे उपसचिव प्रकाश साबळे यांनी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे.