Sat, Jul 20, 2019 12:55होमपेज › Konkan › वेंगुर्ले नगरपालिकेला १० कोटींचे बक्षीस

वेंगुर्ले नगरपालिकेला १० कोटींचे बक्षीस

Published On: Jun 29 2018 12:06AM | Last Updated: Jun 28 2018 10:22PMवेंगुर्ले : शहर वार्ताहर 

स्वच्छ सर्वेक्षण अभियानात 1 लाख लोकसंख्येच्या आतील वर्गवारीत वेंगुर्ले नगरपरिषदेचा कोकण विभागात पहिला क्रमांक आला असून महाराष्ट्रात 9 वा, पश्‍चिम विभागात 10 वा, तर भारतात 18 वा क्रमांक आला आहे. पश्‍चिम विभागातील गुणांकनानुसार 4 ते 10 या वर्गवारीत बसत असल्याने वेंगुर्ले नगरपरिषद 10 कोटींच्या बक्षिसाची मानकरी ठरली असल्याची माहिती मुख्याधिकारी वैभव साबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. केंद्र शासनामार्फत संपूर्ण भारतात स्वच्छ सर्वेक्षण 2018 अंतर्गत स्वच्छ शहर स्पर्धा घेण्यात आली होती. यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातून चार नगरपरिषदा सहभागी झाल्या होत्या.

पश्‍चिम विभागात या चारही नगरपालिका टॉप 50 मध्ये आल्या आहेत. तर कोकण विभागात वेंगुर्ले नगरपरिषद प्रथम आली आहे. आपण घनकचरा व्यवस्थापन यात टॉपमध्ये होतो, मात्र शहरातील स्वच्छतेच्या डॉक्युमेंटेेशन मध्ये वेंगुर्ले नगरपालिका काहीशी मागे पडली. त्यामुळे या स्पर्धेत देशात अव्वल येण्याचा मान गमावल्याचे सांगत  मुख्याधिकारी साबळे यांनी निराशा व्यक्‍त केली.   

यापुढे स्वच्छ सर्वेक्षण 2019 चे गुणांकन स्टार रँकिंगमध्ये होणार आहे. सद्यस्थितीत पहिल्या टप्प्यात वेंगुर्ले न. प. 5 स्टार मानांकनासाठी पात्र आहे.  येत्या काळात आपण 7 स्टारसाठी प्रयत्न करणार असल्याचे साबळे यांनी सांगितले. 

पुढील काळात नगरपालिका विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेणार असून हे मिळालेले यश वेंगुर्लेतील नागरिकांमुळेच आहे. त्यामुळे मुख्याधिकारी साबळे यांनी वेंगुर्लेच्या जनतेचे, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सर्व  नगरसेवक, सभापती, कर्मचारी, स्वच्छतादूत, प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या सहकार्य करणार्‍यांचे पत्रकार परिषदेत आभार मानले आहेत. 

बक्षीस रकमेतून होणारी विकासकामे

स्वच्छ सर्वेक्षण 2018 अंतर्गत मिळणार्‍या निधीतून रस्ते व गटार वगळता शहरातील वैशिष्ट्यपूर्ण कामे हाती घेण्यात येणार आहेत. यापूर्वी मिळालेल्या निधीतून शहरातील घोडेबाव उद्यान, त्रिकोणी गार्डन, मानसी गार्डन आणि नव्याने होऊ घातलेल्या चिल्ड्रन पार्क या चारही गार्डनची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून पावसाळा संपताच याचे काम सुरू होणार आहे. तसेच पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी जुन्या पाईपलाईन बदलून आवश्यक त्या ठिकणी नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम हाती घेण्यात येणार असून शहरात दोन नवीन टाक्या कार्यान्वित झाल्यामुळे शहरातील पाणीप्रश्‍न संपुष्टात येणार आहे. शहरातील सर्व स्मशानभूमी व दफनभूमी या सर्वांचा एकत्रित विकास करणार आहे. शहरातील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून शहर वाहतूक आराखडा संबंधित अधिकार्‍यांकडे पाठवण्यात आला असून येत्या एक-दोन महिन्यांत हा प्रश्‍न मार्गी लागेल, असे  साबळे यांनी सांगितले आहे.