Fri, Jul 19, 2019 20:28होमपेज › Konkan › रत्नागिरी जिल्ह्यातील चार नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी १० कोटी

रत्नागिरी जिल्ह्यातील चार नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी १० कोटी

Published On: Aug 30 2018 1:19AM | Last Updated: Aug 29 2018 9:38PMरत्नागिरी : प्रतिनिधी

जिल्ह्यातील प्रमुख नद्या असलेल्या जगबुडी, गांधारी, अर्जुना व जानवली या चार नद्यांच्या पुनरुज्जीवन योजनेसाठी जलसंधारण विभागाकडून 10 कोटी मंजूर झाले आहेत. या निधीतून 58 जलसंधारण बंधार्‍यांची उभारणी करण्यात येणार आहे. 

या योजनेत तयार करण्यात आलेल्या आराखड्यानुसार जगबुडी, गांधारी, अर्जुना व जानवली या नद्यांच्या क्षेत्रात कामाला सुरुवात झाली. त्याचबरोबर जिल्ह्यातील  अनेक ठिकाणी मुख्य नद्या, उपनद्या, वहाळ तसेच डोह यामधील गाळ काढण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

या योजनेत श्रमदानातून प्राथमिक स्तरावर साखळी बंधारे, गॅबियन बंधारे, मातीचे बंधारे बांधण्यात आले आहे. पावसाळा संपल्यावर जगबुडी, गांधारी, अर्जुना व जानवली या नद्यांच्या उगमापासून पाणी टप्प्याटप्प्याने अडविण्याचे धोरण त्यासाठीचा प्रस्ताव जलसंधारण विभागकडे पाठविण्यात आला होता. या प्रस्तावाला मंजुरी देतानाच प्रत्येक नदीसाठी अडीच कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. चारही नदी क्षेत्रात पुढील तीन महिन्यांत प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. मंजूर निधीतून मुख्यत्वे सिमेंट बंधारे बांधण्यात येणार आहेत.  यामध्ये  गांधारी नदीवर 12, जगबुडी नदीवर 9, अर्जुना नदीवर 27  तर जानवली नदीवर 10 सिमेंट बंधारे बांधण्यात येणार आहेत.