Fri, Jan 24, 2020 22:01होमपेज › Konkan › ‘रत्नागिरी-सिंधुदुर्ग’ची जागा काँग्रेस राष्ट्रवादीला सोडणार?

‘रत्नागिरी-सिंधुदुर्ग’ची जागा काँग्रेस राष्ट्रवादीला सोडणार?

Published On: Mar 15 2019 1:45AM | Last Updated: Mar 15 2019 1:45AM
आरवली ः वार्ताहर

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेची इंदिरा काँग्रेसच्या वाट्याला असणारी जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सोडण्याच्या तयारीत आहे. ही जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला गेल्यास राष्ट्रवादी काँग्रेस स्वाभिमान पक्षाचे उमेदवार नीलेश राणे यांना पाठिंबा देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. यासाठीच काँग्रेसचे संभाव्य उमेदवार नवीनचंद्र बांदिवडेकर यांना अचानक मुंबईत बोलावून घेण्यात आले आहे. 

शिवसेना-भाजपा युतीचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांना पराभूत करण्याचा चंग विरोधी पक्षांनी बांधला आहे. त्यात भाजप कार्यकर्त्यांची राऊत यांच्या विरोधातील नाराजी याचा फायदा कसा होईल, यासंदर्भात आराखडे बांधण्यात येत असून चाचपण्या सुरु आहेत.

राजकीयदृष्ट्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ संवेदनशील बनत चालला आहे. त्यातच शिवसेना-भाजपा युतीला शह देण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी महाआघाडीच्या वाटेवर स्वाभिमान असल्याची चर्चा सुरु आहे. त्यातच काँग्रेस आघाडीचे संभाव्य उमेदवार नवीनचंद्र बांदिवडेकर यांना तातडीने मुंबईत पाचारण करण्यात आल्याने तर्कवितर्कांना वेग आला आहे. बांदिवडेकर यांनी आपला दौरा अर्ध्यात सोडून मुंबई गाठले. 

गेल्या डिसेंबरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सिंधुदुर्ग दौर्‍यावर असताना माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. नारायण राणे यांची भेट झाली होती. तेव्हापासूनच स्वाभिमान आणि राष्ट्रवादी काँग्रेस दरम्यान काही तरी शिजतयं अशी चर्चा होती. त्यामुळे सध्याच्या राजकीय घडामोडींमुळे या चर्चांना विशेष महत्त्व आले आहे.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेची जागा इंदिरा काँग्रेसच्या वाट्याला आहे. असे असताना ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सोडण्यात येईल का? नंतर राष्ट्रवादी काँग्रेस ही जागा स्वाभिमानचे नीलेश राणे यांना देणार असेल तर काँग्रेसला हे सहन होईल का, अशा अनेक अडचणी आघाडीसमोर उभ्या राहू शकतात. 

...तर नाराज भाजप कार्यकर्ते युतीधर्म पाळतील

स्वाभिमानचे नीलेश राणे यांना राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा मिळाल्यास खा. विनायक राऊत यांच्यावर नाराज असलेले भाजपमधील कार्यकर्ते काँगे्रस आघाडी भाजपच्या विरोधात असल्याने नीलेश राणे यांचे काम करण्यास तयार होणार नाहीत. त्यामुळे शेवटी नाईलाजास्तव का होईना, भाजप कार्यकर्ते युतीधर्म पाळतील, अशीही चर्चा आहे.