Thu, Jun 20, 2019 06:29होमपेज › Konkan › रस्त्यांच्या कामांसाठी ‘हायब्रीड अ‍ॅन्युईटी’ चा प्रयोग फसलाच!

रस्त्यांच्या कामांसाठी ‘हायब्रीड अ‍ॅन्युईटी’ चा प्रयोग फसलाच!

Published On: Jun 16 2018 10:46PM | Last Updated: Jun 16 2018 10:30PMसार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्ते विकास क्षेत्रात भांडवली गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाने राज्यातील प्रमुख राज्य महामार्गांची कामे ‘हायब्रीड अ‍ॅन्युईटी’ या नव्या अभिनव प्रकल्पांतर्गत करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र राज्यात काही अपवाद वगळता या प्रकल्पांतर्गत बहुतांशी राज्य मार्गांच्या टेंडर्सना ठेकेदारांचा प्रतिसादच मिळालेला नाही. कोकणातही तीच स्थिती असून  राज्य मार्गांच्या नूतनीकरणाची कामे पूर्णपणे ठप्प झाली आहेत. टेंडर्सना प्रतिसाद नसल्याने राज्य शासनाने सिंधुदुर्ग आणि उत्तर रत्नागिरी सा. बां. विभागातील सर्व राज्य मार्गांचे सुमारे 700 कोटींचे एकच टेंडर या हायब्रीड अ‍ॅन्युईटी अंतर्गत काढून पाहिले, मात्र त्यालाही प्रतिसाद नसल्याने आता रस्त्यांची कामे करायची कशी? असा प्रश्‍न सार्वजनिक बांधकाम विभागासमोर निर्माण झाला असून रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे जनतेच्या रोषाला सार्वजनिक बांधकाम विभागाला सामोरे जावे लागत आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाने केंद्र शासनाने स्वीकारलेल्या ‘हायब्रीड अ‍ॅन्युईटी’च्या धर्तीवर राज्यातील सर्व जिल्ह्यातील मिळून 10 हजार 586 किलोमीटरच्या 30 हजार कोटी रुपये किंमतीच्या 195 कामांना डिसेंबर 2016 च्या हिवाळी अधिवेशनात मंजुरी दिली होती. त्यासाठी 3,500 कोटी रुपयांची तरतूद 2017-18 मध्ये करण्यात आली होती. डिसेंबर 2017 दरम्यान या प्रकल्पांतर्गत टेंडर काढण्यात आले. यामध्ये सिंधुदुर्गातील 65 कि.मी. चा देवगड-निपाणी रस्ता (170 कोटी), आचरा-कणकवली-कनेडी-फोंडा-उंबर्डे रस्ता (297.36 कोटी), देवगड तालुक्यातील विजयदुर्ग-तळेरे-वैभववाडी-गगनबावडा रस्ता (159.60 कोटी), वरवडे-हुंबरणे-कुवळे-नारिंग्रे-हिंदळे रस्ता (24.36 कोटी), कुडाळ तालुक्यातील कुडाळ-पणदूर-घोटगे-गारगोटी रस्ता (81.48 कोटी), मालवण तालुक्यातील मालवण-कसाल व मालवण-देवबाग रस्ता (93.24 कोटी), सावंतवाडी तालुक्यातील कारिवडे-बुर्डी-आरोंदा-रेडी रस्ता (81.48 कोटी), वेंगुर्ले तालुक्यातील गावण (परूळे)-निवती किल्ला रस्ता (18.48 कोटी), केळूस रस्ता सुधारणा करणे (8.4 कोटी), झाराप-आकेरी-सावंतवाडी-बांदा-दोडामार्ग रस्ता (112.56 कोटी) अशा रस्त्यांचा समावेश होता. या रस्त्यांचे नूतनीकरण करणे, सुधारणा करणे अशी कामे यात अंतर्भूत करण्यात आली आहेत. 
यापैकी सा. बां. च्या कणकवली विभागातील केवळ दोन पॅकेजला प्रतिसाद मिळाला. मात्र तीही 30 टक्के अधिकची असल्याने शासनाने ती फेटाळली. सावंतवाडी विभागात एकाही पॅकेजला प्रतिसाद मिळाला नाही. रत्नागिरी जिल्ह्यातही तीच स्थिती होती.  राज्य शासनाचे याबाबत लक्ष वेधल्यानंतर सिंधुदुर्ग आणि उत्तर रत्नागिरीतील सर्व कामांचे एकच टेंडर काढण्यात आले. किमान त्याला तरी प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा सा. बां. विभागाला होती. मात्र तीही फोल ठरली. ‘हायब्रीड अ‍ॅन्युईटी’ प्रकल्पांतर्गत त्या रस्त्याच्या अंदाजपत्रकातील 60 टक्के रक्कम दोन वर्षात राज्य शासन अदा करणार आहे. तर 40 टक्के रक्कम  स्वतः रस्त्याचे काम घेणार्‍या उद्योजकाने गुंतवायची आहे. त्याला दहा वर्षात राज्य शासन त्या रक्कमेचा परतावा करणार आहे. मात्र त्या रस्त्याची दहा वर्षापर्यंतची जबाबदारी त्या उद्योजकाची असणार आहे. दहा वर्षांची जबाबदारी आणि गुंतवणूक या किचकट बाबींमुळे ठेकेदारांचा या टेंडर्सना प्रतिसाद मिळत नाही. जास्तीत जास्त किंमतीच्या दहा टक्के अधिकपर्यंत टेंडर्सना शासन मंजुरी देऊ शकते, मात्र त्याहून अधिक मागणीसाठी शासन मंजुरी देऊ शकत नाही. 

एकूणच ‘हायब्रीड अ‍ॅन्युईटी’च्या या घोळात कोकणातील राज्य मार्गांच्या नूतनीकरणाची कामे ठप्प झाली आहेत. यातील अनेक रस्त्यांवर खड्डे पडले असून संरक्षक कठडे, मोर्‍या आदी कामे करावयाची आहेत. हायब्रीड अ‍ॅन्युईटीमध्ये या रस्त्यांचा समावेश असल्याने शासन इतर बाबीतून निधी या रस्त्यांना देत नाही. त्यामुळे यावर्षी राज्य मार्गांचे एकही काम होऊ शकलेले नाही. केवळ प्रमुख जिल्हा मार्गांची कामे गेल्या हंगामात सा. बां. विभागाने केली. रस्त्यांचे नूतनीकरण होत नसल्याने रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत जनतेचा रोष वाढला आहे. कालच आचरा-कणकवली या राज्य मार्गाच्या दुरावस्थेकडे लक्ष वेधण्यासाठी रास्ता रोको आंदोलन छेडण्यात आले होते.  मात्र, हा मार्ग हायब्रीड अ‍ॅन्युईटीत समावेश करण्यात आला असल्याने सा. बां. विभागाची गोची झाली आहे. तरीही जास्तीत जास्त खराब झालेल्या चार ते पाच किलोमीटर रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीसाठी सुमारे अडीच कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मात्र, ते काम आता पावसाळ्यानंतरच होणार आहे.