Thu, Jul 18, 2019 08:46होमपेज › Konkan › ...म्हणे सिंधुदुर्गात डॉक्टर्स येत नाहीत!

...म्हणे सिंधुदुर्गात डॉक्टर्स येत नाहीत!

Published On: May 24 2018 10:30PM | Last Updated: May 24 2018 10:20PMसिंधुदुर्गातील शासकीय रूग्णालयांतील वैद्यकीय अधिकार्‍यांची अनेक पदे रिक्त आहेत. सिंधुदुर्गात काम करण्यास डॉक्टर्स तयार होत नाही, असे उत्तर नेहमीच आरोग्य विभाग व राज्यकर्त्यांकडून दिले जाते. मात्र कणकवली उपजिल्हा रूग्णालयात रूग्णसेवा करण्यासाठी दोन डॉक्टर्स इच्छुक असतानाही त्यांना अस्थायी स्वरूपात नेमणूक देणे आरोग्य विभागाकडून चालढकल केली जात आहे. गेले दोन महिने  हे डॉक्टर्स नेमणूक मिळण्यासाठी प्रयत्नशील असताना आरोग्य विभागाकडून टोलवाटोलवी केली जात आहे. त्यामुळे सिंधुदुर्गात खरोखरच डॉक्टर्स येण्यास तयार नाहीत की आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचार्‍यांची डॉक्टर्स आणण्याची मानसिकता नाही हा प्रश्‍न निर्माण होतो. 

कणकवली उपजिल्हा रूग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून अस्थायी स्वरूपात डॉ. महेंद्र आचरेकर हे कार्यरत आहेत. त्यांच्या कराराची मुदत संपत आल्याने प्रतिनियुक्तीचा प्रस्ताव फेब्रुवारीमध्ये आरोग्य विभागाच्या कोल्हापूर उपसंचालक कार्यालयाकडे पाठविला होता. खरेतरं त्यांना तातडीने नेमणूक मिळेल असे अपेक्षित होते. मात्र उपसंचालक कार्यालयाकडून त्यांच्या प्रस्तावावर कोणताच निर्णय देण्यात आला नाही. अखेर या विषयीची चौकशी केली असता उपजिल्हा रूग्णालयात पुरेस वैद्यकीय अधिकारी आहेत, तसेच अस्थायी स्वरूपातील नेमणूका देणे आरोग्य संचालकांच्या अखत्यारीत आहेत, असे उपसंचालक कार्यालयाकडून सांगण्यात आले. फेब्रुवारी मध्ये दिलेल्या प्रस्तावावर कोणतेच उत्तर न देता 15 मे रोजी उपसंचालक कार्यालयाकडून असे उत्तर मिळाल्याने डॉ. आचरेकर यांना भ्रमनिरास व्हावे लागले. 

डॉ. आचरेकर यांच्यासह स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र तज्ञ असलेल्या डॉ. अर्पिता  दरीपकर यांनाही आरोग्य विभागातील या कारभाराचा असाच अनुभव आला. डॉ. दरीपकर कणकवली उपजिल्हा रूग्णालयात रूग्णसेवा देण्यास इच्छुक आहेत. मात्र उपसंचालक कार्यालयाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. एकीकडे सिंधुदुर्गात डॉक्टर्स येण्यास तयार होत नाही असे सांगितले जात असताना दुसरीकडे उपजिल्हा रूग्णालयात काम करण्यास दोन डॉक्टर्स इच्छुक असतानाही त्यांना नेमणूक देण्यास टाळाटाळ केली जात असल्याने सिंधुदुर्गातील सर्वसामान्य रूग्णांना शासकीय आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याविषयी कोणतीही बांधिलकी या अधिकार्‍यांना नसल्याचे दिसून आले. 

कणकवली उपजिल्हा रूग्णालयात वैद्यकीय अधिकार्‍यांची 14 पदे मंजूर असून त्यापैकी 10 पदे भरलेली असल्याची नोंद आरोग्य विभागामध्ये आहे. मात्र उपजिल्हा रूग्णालयात प्रत्यक्षात वैद्यकीय अधिक्षकांसह सहा डॉक्टर्स कार्यरत आहेत. आरोग्य विभागाकडे नोंद असलेल्या इतर चार डॉक्टर्सपैकी डॉ. बिरादार हे गेली तीन महिने कार्यरत नाहीत तर कोल्हापूर येथून जुलै मध्ये बदली झालेल्या डॉ. पाटील हे उपजिल्हा रूग्णालयात हजर झालेच नाहीत. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात करारावर नेमणूक दिलेल्या डॉ. मनिषा तोमर हजर झाल्याच नाहीत तर डॉ. पोळ हे पुढील शिक्षणासाठी नागपूर येथे गेले असून त्यांना गेली दोन वर्षे उपजिल्हा रूग्णालयात कार्यरत असल्याचे दाखविले जात आहे.

 सिंधुदुर्गात पावसाळ्यात व त्यानंतर साथ रोग निर्माण होत असल्याने दरवर्षी मोठ्या प्रमाणात रूग्ण कणकवली उपजिल्हा रूग्णालयात दाखल होतात. साथ रोगात कार्यरत असलेल्या डॉक्टर्सवर अधिक ताण येतो. 

साथरोग निर्माण झाल्यानंतर लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी रूग्णालयात भेट देवून बैठका घेण्याचे सोपस्कार पूर्ण करतात. मात्र हेच अधिकारी रूग्णालयात काम करण्यासाठी इच्छुक असणार्‍या डॉक्टर्सना शासन निर्णय आणि नियमांवर बोट ठेवून नेमणूक देण्यासाठी टाळाटाळ करत आहेत. यातून या अधिकार्‍यांना सिंधुदुर्गातील सर्वसामान्य नागरीकांच्या आरोग्याचे काही देणेघेणे नाही, हेच दिसून येते.