Wed, Jan 22, 2020 01:25होमपेज › Konkan › कातकरी वाड्यांचा सातबारा कोराच!

कातकरी वाड्यांचा सातबारा कोराच!

Published On: Sep 03 2018 1:39AM | Last Updated: Sep 02 2018 9:07PMदापोली : प्रवीण शिंदे

रत्नागिरी जिल्ह्यातील कातकरी कुटुंबांकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे. जिल्ह्यातील 132 कातकरी वाड्यांचा सातबारा कोरा आहे. ज्या घरात राहतो त्या घराची जागा कातकरी समाजाच्या नावे नसल्याने घरकुलसारख्या शासकीय योजना आणि सोयीसुविधा आजपर्यंत या समाजापर्यंत पोहोचत नसल्याने हा समाज विकासापासून दुर्लक्षित राहिला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड, दापोली, खेड, चिपळूण, गुहागर, संगमेश्‍वर या तालुक्यात मिळून 132 कातकरी वाड्या आहेत. मात्र, या वाड्यांपर्यंत शासकीय सुविधा पोहोचल्याच नाहीत. शासकीय सुविधा मिळाव्यात म्हणून जिल्ह्यातील कातकरी समाज आजही शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजवित आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून अनेक  वर्षे झाली मात्र कातकरी समाजाला अद्यापही न्याय मिळालेला नाही.

महाराष्ट्र शेत जमीन अधिनियमानुसार कातकरी समाजाची नावे सातबारावर नमूद करावी म्हणून 2017 साली समाज संघटनेच्यावतीने जिल्हाधिकार्‍यांना पत्र देण्यात आले होते. या पत्राची दखल घेत जिल्हाधिकारी प्रशासनाने दापोली, मंडणगड, खेड, चिपळूण, गुहागर, संगमेश्‍वर या तालुक्यातील तहसील कार्यालयांना निर्देश दिले होते. मात्र, आजतागायत याबाबत परिस्थिती ‘जैसे थे’ आहे. 

कातकरी वाड्यांना गावठाणाचा दर्जा मिळावा म्हणून एकलव्य कातकरी आदिवासी संघटना या संघटनेच्या माध्यमातून संघटनेचे कार्याध्यक्ष प्रमोद निकम शासनाकडे पाठपुरावा करीत आहेत. मात्र, गावठाणाचा दर्जा मिळत नसल्याने शासकीय योजनांना खीळ बसत आहे. विकासकामांच्या दृष्टीकोनातून कातकरी समाजासाठी आर्थिक बजेट नाही. त्यामुळे वर्षानुवर्षे समाजापर्यंत योजना पोहोचल्याच नाहीत. न्युक्लियस बजेट अंतर्गत जिल्ह्यात फक्त 50 हजारांची तरतूद या समाजासाठी आहे.जिल्ह्यातील अनेक ठिकाणी कातकरी समाजाची कुटुंब राहतात. मात्र, ज्या ठिकाणी घर आहे, त्या जागेचा सातबारा त्यांच्या नावावर नसल्याने मोठी गैरसोय होत आहे.