होमपेज › Konkan › अंगणवाडी सेविकांचे मुंबईत 20 मार्चला ठिय्या आंदोलन

अंगणवाडी सेविकांचे मुंबईत 20 मार्चला ठिय्या आंदोलन

Published On: Mar 06 2018 10:39PM | Last Updated: Mar 06 2018 10:23PMकुडाळ: वार्ताहर

अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ झाली असली तरी आता शासनाने  1 एप्रिल 2018 ला वयाची 60 वर्षे पूर्ण करणार्‍या अंगणवाडी कर्मचार्‍यांना सेवानिवृत्त करावे, असे  आदेश जारी केले आहे. साठीत पोहोचलेल्या या कर्मचारी एकात्मिक बालविकास योजनेच्या पायाचे दगड आहेत. शंभर रूपयांपासून  काम करणार्‍या या कर्मचार्‍यांच्या मानधनात वाढ झाल्यावर त्यांना घरी बसण्याची वेळ शासनाने आणली आहे. त्यामुळे आता यापुढील  लढा हा जुन्या अंगणवाडी कर्मचार्‍यांचे निवृत्ती वय 65 वर्षाचेच ठेवावे, यासाठी असणार आहे.  यासाठी 20 मार्च रोजी मुंबईत ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती  अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या नेत्या श्रीम.  कमलताई परूळेकर यांनी दिली.
नव्या शासन निर्णयानुसार नव्याने रूजू होणार्‍या सेविकांना 6 हजार 500 रूपये मानधन मिळणार आहे. तर जुन्या कर्मचार्‍यांचेही आता मानधन चांगल्या प्रमाणात वाढले आहे. 1 ऑक्टोबर पासूनची ही वाढ 1 एप्रिलला कर्मचार्‍यांना मिळणार आहे. मात्र आता वयाच्या 60 व्या वर्षानंतर या कर्मचार्‍यांना सेवेतून निवृत्त करण्याचा निर्णय न घेण्याचा दृष्टपणा शासनाने केला आहे. त्यामुळे आता सेवेत असणार्‍यांच्या निवृत्तीचे  वय 65 वर्षेच ठेवावे, यासाठी पुन्हा एकदा ताकदीनिशी अंगणवाडी कर्मचार्‍यांना लढावे लागणार आहे, असे कमलताई परूळेकर यांनी सांगितलेे. 30 एप्रिल 2014 ला शासनाने  पेन्शनचा आदेश काढला व या तारखेनंतर निवृत्त होणार्‍यांना एक रक्कमी पेन्शन दिली. या तारखेपूर्वी निवृत्त होणार्‍या कर्मचार्‍यांना काहीच दिले नाही. 2010 मध्ये शैक्षणिक अट घातली. यावेळीही ऑगस्ट 2010 नंतर नेमणुका नव्या शैक्षणिक अटीनुसार  म्हणजे सेविकांना एस.एस.सी. पास व मदतनीसांना सातवी पास याप्रमाणे केल्या. पण त्यापूर्वीच्या सातवी व आठवी झालेल्या सेविकांना त्यांची झळ पोहचू दिली नाही. मग आता नव्या शासन आदेशानुसार जुन्या कर्मचार्‍यांवर सक्रांत का? असा प्रश्‍न श्रीम. परूळेकर  यांनी करत आंदोलनाशिवाय सरकारला कोणतीच भाषा कळत नसल्याचेही म्हटले आहे. साठी उलटलेल्या सुमारे 3 हजार कर्मचार्‍यांचे शिव्याशाप शासनाला महाग पडणार आहेत.