Thu, Apr 18, 2019 16:01होमपेज › Kolhapur › गुणवत्तेची हमी; पण शिक्षकच कमी!

गुणवत्तेची हमी; पण शिक्षकच कमी!

Published On: Dec 15 2017 2:44AM | Last Updated: Dec 15 2017 2:08AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रवीण मस्के

जिल्हा परिषदेच्या शाळांमधील पटसंख्या कमी होत चालली आहे, गुणवत्ता नसल्याने इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे कल वाढला, अशी ओरड होताना दिसते. दुसरीकडे जिल्हा परषिदेच्या प्राथमिक शाळेत 357 हून शिक्षक पदे रिक्‍त असल्याने शैक्षणिक गुणवत्तेवर याचा परिणाम होत आहे. त्यामुळे ‘शिक्षक कमी, कशी मिळणार गुणवत्तेची हमी’ असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. 
गरीब, कष्टकरांच्या मुलांना शिक्षण देणार्‍या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा म्हणून परिचित आहेत. परंतु, गेल्या काही वर्षांपासून शिक्षण विभागाकडून काढण्यात येत असलेल्या नवनवीन परिपत्रक, आदेशामुळे प्राथमिक शिक्षण अडचणीत आले आहे. नुकताच राज्यातील 13 हजार शाळा बंदचा निर्णय घेण्यात आला. यात जिल्ह्यातील 30 हून अधिक शाळांमधील विद्यार्थी जवळील शाळेत स्थलांतरित करण्यात येणार आहेत.
 शासनाने 2012 पासून शिक्षक भरतीवर बंदी घातली. त्यानंतर शिक्षक भरतीला अंशत: परवानगी देण्यात आली. मात्र, भरलेल्या पदांना अद्याप मान्यता मिळालेली नाही. दरवर्षी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) घेण्यात येते; परंतु अद्याप परीक्षा पास झालेल्या उमेदवारांना नोकरी मिळालेली नाही. काही दिवसांपूर्वी शिक्षण विभागाने ‘पवित्र’ प्रणालीमार्फत अभियोग्यता चाचणी घेऊन शिक्षक भरती करण्याचे ठरविले. त्यानुसार राज्यभर परीक्षा घेतल्या जात आहेत. यानंतरही पात्र उमेदवारांना नोकरी मिळतील का? याची खात्री कोणीही देऊ शकत नाही.

 जिल्हा परिषदेच्या 2002 शाळा असून यात सुमारे दोन लाखांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. दरवर्षी शाळांमधील शिक्षक निवृत्त होत आहेत. स्वेच्छा निवृत्तीमुळेही शिक्षकांची संख्या कमी झाली आहे. आंतरजिल्हा बदलीने आलेले शिक्षक हजर झालेले नाहीत. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत 300 हून अधिक शिक्षक पदे रिक्‍त आहेत, याचा इतर शिक्षकांवरील ताण वाढला आहे. यातील सर्वाधिक रिक्‍त पदे शाहूवाडी तालुक्यात 
आहेत.