Fri, Apr 19, 2019 08:00होमपेज › Kolhapur › आरोग्य विभागातर्फे  मुदतबाह्य मच्छरदाणी वाटप

आरोग्य विभागातर्फे  मुदतबाह्य मच्छरदाणी वाटप

Published On: Jan 13 2018 1:12AM | Last Updated: Jan 12 2018 11:57PM

बुकमार्क करा
कोल्हापूर : प्रतिनिधी

आरोग्य विभागातर्फे मुदतबाह्य मच्छरदाण्यांचे वाटप झाल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. जिल्हा हिवताप विभागाचे हे प्रताप भ्रष्टाचारविरोधी जनशक्‍तीने उघडकीस आणले आहेत. विशेष म्हणजे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने आपला याच्याशी काय संबंध नसल्याचे सांगत अंग काढून घेतले आहे. दरम्यान, यासंदर्भात जिल्हा हिवताप अधिकार्‍यांशी संपर्क साधला असता, बाहेरगावी असल्याने सविस्तर माहिती देण्यास नकार दिला. जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांनी मात्र यासंदर्भात हिवताप अधिकार्‍यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस काढण्याची तयारी केली आहे.

भ्रष्टाचारविरोधी जनशक्‍ती संघटनेचे कार्यकर्ते साताप्पा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ शुक्रवारी दुपारी जिल्हा परिषदेत आले होते. पण त्यांचे निवेदन स्वीकारण्यासाठी जिल्हा आरोग्यधिकारी डॉ. प्रकाश पाटील हे कार्यालयात नसल्याने संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी निषेध व्यक्‍त करत कार्यालयासमोर कक्ष अधीक्षकांना निवेदन दिले. या निवेदनाद्वारे मच्छरदाणी वाटपात घोटाळा झाला असून त्याची सविस्तर माहिती तातडीने द्यावी, संबंधित अधिकार्‍यांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. यासंदर्भात अधिक माहिती घेतली असता, जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या नियंत्रणाखालीच हा विभाग असला तरी मच्छरदाण्यांचे वाटपाचे काम हिवताप विभागाकडेच असते. डासांचा उपद्रव टाळून डेंग्यूपासून बचावासाठी पावसाळा सुरू होताना आणि संपताना हिवताप विभागाकडून मच्छरदाण्यांचे वाटप केले जाते. यावर्षी मात्र पावसाळा संपला तरी वाटप झाले नाही. आता त्याचे वाटप सुरू झाले; पण  त्या पाकिटावर उत्पादन निर्मिती आणि उत्पादन वापराची अंतिम तारीख यात मोठी तफावत जाणवत आह.ेडिसेंबर 2014 मध्ये उत्पादित केलेल्या मच्छरदाण्यांवर ऑगस्ट 2017 ही एक्स्पायरी डेट आहे. तीन वर्षांसाठीच मच्छरदाण्या वापरावयाच्या असतानाही मुदत संपताना त्या वाटल्या जात आहेत.
फेकून देण्याच्या योग्यतेच्या असलेल्या या मच्छरदाण्या आता वाटप करून सर्वसामान्य जनतेच्या जीवाशी का खेळताय, इतके दिवस त्या का वाटल्या नाहीत, अशा प्रश्‍नांची तातडीने उत्तरे मिळावीत, असा आग्रह संघटनेने निवेदनातून धरला आहे.

कर्मचारी खेळात मश्गूल, अधिकारी बैठकीसाठी दौर्‍यावर

कोल्हापूर : प्रतिनिधी

अधिकारी आणि कर्मचार्‍यांविना जिल्हा परिषद ओस पडली असून सोमवार व शुक्रवारी मुख्यालयात सक्‍तीने हजर राहण्याचा नियमही या दोन्ही घटकांकडून विसरला गेला. वार्षिक क्रीडा स्पर्धांच्या नावाखाली कर्मचार्‍यांनी मुख्यालयापेक्षा मैदानासह अन्यत्र तळ ठोकला, तर मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांसह इतर खातेप्रमुख बैठकांसाठी बाहेर होते. शुक्रवारी दुपारनंतर तर ठराविक कर्मचारी वगळले तर कोणी नसल्याने कामे घेऊन आलेल्या जि.प. सदस्य, पंचायत समिती सभापतींची मोठी गोची झाली. त्यांनी याबद्दल उघडपणे नाराजी व्यक्‍त केली आहे.
सोमवार आणि शुक्रवार असे दोन वार सक्‍तीने कर्मचारी व अधिकार्‍यांनी मुख्यालयात हजर राहावे आणि कामांचा निपटारा करावा, असे शासन आदेश आहेत. त्याचे पालनही जिल्हा परिषदेत काटेकोरपणे होते. पण आता वार्षिक क्रीडा स्पर्धेवेळी या नियमाचा सर्वांनाच विसर पडल्यासारखी परिस्थिती शुक्रवारी जिल्हा परिषदेत होती. मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांसह सर्व खातेप्रमुखही नव्हते. सामान्य प्रशासनाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पुण्याला तर कृषी विकास अधिकारी गारगोटीला कृषी प्रदर्शन उद्घाटनासाठी गेले होते. आरोग्य अधिकारी बैठकीसाठी बाहेर होते. इतर सर्व अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांसमवेत दुपारनंतर जिल्हाधिकारी कार्यालयातील व्हीसीसाठी गेले होते. दोन्ही शिक्षणाधिकारी केशवराव भोसले नाट्यगृहातील सांस्कृतिक कार्यक्रमात व्यस्त होते. अधिकारी नसल्याने पदाधिकार्‍यांनीही जि.प.कडे पाठच फिरवली. जि.प. अध्यक्ष, शिक्षण सभापती शालेय विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमात होते. पदाधिकारी, अधिकारी नसल्यामुळे कर्मचारी मात्र निवांत होते. शुक्रवारी शास्त्रीनगर ग्राऊंडवर क्रिकेटचा अंतिम सामना होता. तालुकांतर्गत सामने असतानाही मुख्यालयातील बहुतांश कर्मचारी मैदानावर गेले होते. चार वाजल्यानंतर जे काही कर्मचारी मुख्यालयात होते, ते देखील अन्य स्पर्धांच्या प्रॅक्टिससाठी म्हणून मुख्यालयातून गायब झाले. यातील बर्‍याच कर्मचार्‍यांनी सहा वाजण्यापूर्वीच घरचा रस्ता धरला. सामान्य प्रशासनातील अधीक्षक मात्र कागलकर हाऊसमध्ये प्रदर्शन भरणार असल्याने आपल्या टीमसमवेत अभिलेखा वर्गीकरणाचे गठ्ठे उचलून जागा रिकामी करण्यात व्यस्त होते.