Tue, Mar 19, 2019 05:45होमपेज › Kolhapur › तरुणाईला नशिल्या पदार्थांचा विळखा

तरुणाईला नशिल्या पदार्थांचा विळखा

Published On: Jun 24 2018 1:56AM | Last Updated: Jun 23 2018 11:49PMकोल्हापूर : प्रतिनिधी

गांजा, दारूबरोबरच ब्राऊन शुगरसारख्या नशिल्या पदार्थांच्या विळख्यात तरुणाई सापडली आहे. टाकाळा परिसरातील उद्यानात गांजासह उत्तेजक पदार्थांचे सेवन करणार्‍या युवतीसह पाच तरुणांना राजारामपुरी पोलिसांनी पकडल्यानंतर ही बाब अधिकच ठळक झाली आहे. नशिल्या पदार्थांची राजरोस विक्री रोखण्याचे आणि तरुणाईला व्यसनापासून रोखण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.  शहरात उत्तेजक पदार्थांच्या विक्रीचा बाजारच मांडल्याचे चित्र आहे. बसस्थानक, रेल्वेस्टेशन, परिख पूल, रंकाळा, शिवाजी पुलासह जवाहरनगर, सम्राटनगर, आर. के.नगर परिसरात मुंबई, पुण्यातील तस्करांचा वावर वाढला आहे. लाखो रुपयांची उलाढाल होत असतानाही तस्कर, स्थानिक एजंटांचा सुगावा कसा काय लागत नाही, हाही प्रश्‍न आहे. शाळकरी मुलांपासून कॉलेज तरुणांपर्यंत कित्येकजण नशिल्या पदार्थांच्या आहारी गेले आहेत. सार्वजनिक बाग-बगीच्यांबरोबरच शहराबाहेरील निर्जन स्थळांवर त्यांचे अड्डे तयार झाले आहेत. 

जिल्ह्यात नशिल्या पदार्थांची विक्री करणार्‍या रॅकेटची पाळेमुळे व्यापक प्रमाणात विखुरली गेली आहेत. निर्जन ठिकाणी प्रेमीयुगुलांचा वावर वाढला आहे.  रिकाम्या सिगारेट पाकिटांसह संशयास्पद वस्तूंचा ढीग पाहायला मिळतो. उत्तेजक पदार्थांच्या पुड्या, छोट्या डब्या आढळून येतात. बहुतांशी घटना पोलिसांच्या कानावर येतात. अनेकदा संशयास्पद पदार्थांसह संशयितांना ताब्यात घेतले जाते. कारवाईचा धाक दाखवून ‘तोडपाणी’ करून सोडून देण्याचा धंदा सुरू झाला आहे. पोलिस यंत्रणेची बेफिकिरी, पालकांचे दुर्लक्ष आणि अगदी सहज उपलब्ध होणारे नशिले पदार्थ यामुळे तरुणाईमध्ये व्यसनाधिनतेचे प्रमाण वाढत आहे. 

राजारामपुरी पोलिस ठाण्याच्या पथकाने शुक्रवारी टाकाळा परिसरातील उद्यानात छापा टाकून दोन युवतींसह पाचजणांना ताब्यात घेतल्यानंतर अनेक बड्या मंडळींनी हस्तक्षेपाचा प्रयत्न केला. सहा, सात आलिशान कार पोलिस ठाण्यासमोर लागल्या होत्या.  कोण होते हे हस्तक? त्यांचा काय संबंध? असे प्रश्‍नही यानिमित्ताने उपस्थित केले जाऊ लागले आहे. संशयितांच्या सुटकेसाठी फिल्डिंग लावणार्‍यांचीच पोलिसांनी कसून चौकशी करणे गरजेचे आहे. कॉलेज तरुणांनी गांजा कोठून मिळविला? याचा तपास होणे गरजेचे आहे. तात्पुरती मलमपट्टी नको.त्याची व्याप्ती शहर, जिल्ह्यात राबविल्यास तस्करीला आळा तर बसेल; पण नशेच्या मागे भरकटत जाणार्‍या तरुणाईला निश्‍चित ब्रेक लागेल.

अंमली पदार्थांसह तस्करांवरुद्ध जिल्ह्यात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. अशा गंभीर घटनांकडे डोळेझाक करणार्‍या अधिकारी, कर्मचार्‍यांवर प्रसंगी निलंबनाची कारवाई केली जाईल.
- संजय मोहिते, पोलिस अधीक्षक, कोल्हापूर