Mon, Jun 24, 2019 17:16होमपेज › Kolhapur › राजकीय पक्षांचे तरुणाकडे दुर्लक्ष

राजकीय पक्षांचे तरुणाकडे दुर्लक्ष

Published On: Jun 23 2018 1:21AM | Last Updated: Jun 23 2018 12:05AMकोल्हापूर :  सुनील सकटे 

जागतिक लोकसंख्येच्या तुलनेत भारतात तरुण मतदारांचे प्रमाण वाढत आहे. तरुणांचे वाढते प्रमाण पाहता जगात तरुणांचा देश म्हणून पुढे येत असताना अनेक राजकीय पक्षांनी मात्र तरुणाईकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून  येते. प्रत्येक राजकीय पक्षाची युवक आणि विद्यार्थी आघाडी केवळ नावापुरतीच असल्यामुळे राजकीय पक्षांनी तरुणाईकडे असल्याचे स्पष्ट होत आहे. 

जिल्ह्यातील एकूण मतदारांपैकी तब्बल 40 टक्के मतदार हे वयाच्या 40 पेक्षा कमी वयोगटातील आहेत. जिल्ह्यात ऑक्टोबर 2017 ते 10 जानेवारी 2018 या कालावधीत 22 हजार 896 नवीन मतदारांची वाढ झाली आहे. यापैकी 18 ते 29 वयोगटातील 25 हजार मतदारांचा समावेश आहे. हे प्रमाण पाहता, जानेवारी 2019 पर्यंत 18 ते 20 या वयोगटातील नव मतदारांच्या संख्येत 30 ते 40 हजारांपेक्षा अधिक वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे जिल्ह्याच्या लोकसभा मतदार संघात सरासरी 15 ते 20 हजार तर विधानसभेच्या प्रत्येक मतदार संघात सरासरी 3 ते 4 हजार आणखी तरुण मतदारांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. 

जिल्ह्यातील परिस्थती पाहता राज्य व देशपातळीवर तरुण मतदारांच्या भूमिकेस विशेष महत्त्व आहे. असे असताना विविध राजकीय पक्षांत तरुणांना केवळ गृहीत धरण्यात येत असल्याचे दिसून येते. राष्ट्रीय पातळीवरील पक्षांमध्ये काँग्रेस आणि भाजप या पक्षसंघटन कार्यात तरुणांना फार संधी मिळत नसल्याचे चित्र आहे. काँग्रेसचे जिल्हा व शहराध्यक्ष पदांचा विचार केल्यास काँग्रेसने पारंपरिक वैचारिक बैठकीतच ही पदे ठेवली आहे. ज्येष्ठांना संधी ही पारंपरिक बैठक आताही कायम आहे. एवढेच नाही तर या पक्षाचे युवक आणि विद्यार्थी विभाग फारसे सक्रिय होत नसल्याचेच चित्र आहे. भारतीय जनता पक्ष सध्या राज्यात व देशात सत्तेवर आहे. या पक्षाचे जिल्ह्यातील मूळचे खंदे कार्यकर्ते सोडले तर या पक्षात आयात कार्यकर्त्यांचा भरणा अधिक दिसतो. आयात कार्यकर्त्यांतही  तरुणाईचे प्रमाण अगदी नगण्य आहे. या पक्षाचे युवक विद्यार्थी विभागांची स्थिती फारसी वेगळी नाही. या पक्षाचे जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष ज्येष्ठ असून  महानगर अध्यक्षांनीही चाळिशी गाठली आहे.  

राष्ट्रवादी आणि  शिवसेनेचा विचार केल्यास तेथेही परिस्थितीत फारसा बदल दिसून येत नाही. ज्येष्ठांचे वर्चस्व असणार्‍या या पक्षांतही तरुणाई पूर्णपणे दुर्लक्षित असल्याचे जाणवते. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्षपद ज्येष्ठांच्या ताब्यातच आहे. शहराध्यक्ष पदाबाबत अद्याप चर्चाच सुतू आहेत. शिवसेनेत तर तीन जिल्हाप्रमुख असून तीनही चाळिशी पार केलेले आहेत. युवा सेनेचे विद्यार्थीही सेनेत काहीअंशी तरुणांना संधी असली तरी त्यांचा पक्षसंघटनेच्या निर्णय प्रक्रियेत फारसा हस्तक्षेप नसल्याचे सांगण्यात येते. भाकप, माकप, शेकाप अशा छोट्या परंतु, चळवळीतील पक्षांमध्ये तरुणाईस फारसे स्थान दिसून येत नाही. या पक्षांतही ज्येष्ठांनी पदांवर अद्याप कमांड ठेवली आहे.. 

...तर सर्वच पक्षांना निश्‍चितच फायदा

एकीकडे देशाची लोकशाही ज्या तरुणाईच्या हातात आहे त्या तरुणाईकडे राजकीय पक्ष सोयीस्करपणे दुर्लक्ष करीत आहे.  तरुणाईचा वाढता टक्का पाहता भविष्यात सर्वच राजकीय पक्षांनी तरुणाईच्या हातात पक्षाची सूत्रे देण्याची गरज आहे. तरुणाईच्या हातात सूत्रे देताना ज्येष्ठांनी मार्गदर्शकांच्या भूमिकेत राहून थिंक टँक म्हणून कार्यरत राहिल्यास प्रत्येक पक्षाचा कमी-अधिक प्रमाणात फायदा झाल्याशिवाय राहणार नाही.