Mon, Apr 22, 2019 12:10होमपेज › Kolhapur › तरुणाची आत्महत्या

तरुणाची आत्महत्या

Published On: Jul 11 2018 1:48AM | Last Updated: Jul 11 2018 1:45AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

पोलिस ठाण्यातून घरी परतल्यानंतर काही वेळातच नितीन नंदकुमार ओतारी (वय 31, रा. शुक्रवार पेठ) याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांच्या दबावाने त्याने आत्महत्या केल्याचा आरोप नातेवाइकांनी केल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले. परंतु, या घटनेबाबत आपली तक्रार नसल्याचा जबाब नितीनचे वडील नंदकुमार ओतारी यांनी दिल्याची माहिती पोलिस निरीक्षक वसंत बाबर यांनी दिली. 

नितीन ओतारी रिक्षा चालवत होता. सोमवारी त्याची रिक्षा आणि ट्रॅक्टरचा अपघात झाला होता. अपघाताबाबत जबाब नोंदविण्यासाठी मंगळवारी त्याला लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात बोलावण्यात आले होते. सकाळी आठच्या सुमारास तो लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात आला. काही मिनिटांतच तो पोलिस ठाण्यातून निघून गेला. साडेनऊच्या सुमारास त्याने राहत्या घरी गळफास घेतल्याचे उघडकीस आले. ही घटना आईने पाहिल्याने तिने आरडाओरडा करून शेजार्‍यांना बोलावले. 

नितीन ओतारीवर यापूर्वीही चोरी, खुनाचा प्रयत्न, हाणामारीचे गुन्हे दाखल आहेत. सध्या तो जामिनावर सुटला होता. सध्या रिक्षा चालवून चरितार्थ चालवीत होता. सोमवारी झालेल्या अपघाताबाबत त्याला पोलिस ठाण्यात बोलावण्यात आले होते. 

मारहाणीचा आरोप 

नितीन ओतारीला पोलिस ठाण्यात मारहाण झाल्याचा आरोप त्याचा भाऊ नीलेश ओतारी याने केला. सकाळी पोलिस ठाण्यातून आल्यानंतर त्याने काही पोलिसांचा दबाव असल्याचे आपल्या आईला सांगितले होते. नऊच्या सुमारास आई घराबाहेर जाताच त्याने साडीने गळफास लावून घेतला. 

आरोप निराधार : पोलिस निरीक्षक वसंत बाबर

सोमवारी झालेल्या अपघातानंतर ट्रॅक्टरचालकाला नुकसानभरपाई देण्याबाबत माहिती देण्यासाठी ओतारी पोलिस ठाण्यात आला होता. यानंतर तो काही मिनिटांत स्वत:हून निघून गेला. त्याला कोणीही मारहाण केलेली नाही. त्याच्या अंगावर असणारे जखमांचे व्रण जुने आहेत. नातेवाइकांच्या माहितीसाठी पोलिस ठाण्यातील सीसीटीव्ही फुटेजही उपलब्ध करून देण्यात आले होते. मारहाणीचे किंवा दबावाचे आरोप पूर्णपणे निराधार असल्याचे निरीक्षक बाबर यांनी सांगितले.