Wed, Apr 24, 2019 00:13होमपेज › Kolhapur › युवक राष्ट्रवादी काँग्रेसचा उद्या एल्गार मोर्चा

युवक राष्ट्रवादी काँग्रेसचा उद्या एल्गार मोर्चा

Published On: Feb 05 2018 1:30AM | Last Updated: Feb 04 2018 11:24PMकोल्हापूर : प्रतिनिधी

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने मंगळवारी (दि. 6) जिल्हाधिकारी कार्यालयावर एल्गार मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. सकाळी दहा वाजता सासने मैदानावरून या मोर्चाला सुरुवात होणार आहे. युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष नाविद मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

मुश्रीफ म्हणाले, भाजप सरकारकडून भ्रमनिरास झाला आहे. सर्वसामान्यांसह शेतकर्‍यांनाही सरकारने फसविलेच, शिवाय युवकांचीही घोर निराशा केली आहे. निवडणुकीपूर्वी दिलेली आश्‍वासने सरकारने पाळलेली नाहीत. विद्यार्थ्यांना शिष्यवृती मिळत नसल्याने अनेकांना शिक्षणाची विवंचना आहे. युवा वर्गाला बेरोजगारी सतावत आहे. नोकर्‍या उपलब्ध करण्याचे दिलेले आश्‍वासन हवेत विरले आहे. अशाप्रकारे सरकारने युवा वर्गाला नाहक फसविल्याने युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राज्यभर आंदोलन आयोजित केले आहे. प्रदेश अध्यक्ष संग्राम कोते-पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर हे आंदोलन सुरू आहे.

पक्षाचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील म्हणाले, सरकारने शेतकर्‍यांसाठी जाहीर केलेली कर्जमाफी फसवी आहे. इंधनाचे दर दिवसेंदिवस वाढतच आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांचे जीवन मुश्किल बनले आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठीच हा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे.पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य आर.के.पोवार यांनी सांगितले, केवळ बड्या उद्योजकांनाच सरकार पाठीशी घालत आहे. सर्वसामान्यांसाठी सरकारकडून काहीच गेले जात नसल्याचे चित्र आहे. पत्रकार परिषदेला शहर अध्यक्ष राजेश लाटकर, युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रोहित पाटील उपस्थित होते. या दोघांनीही युवकांच्या विविध प्रश्‍नांसाठीच हा मोर्चा आयोजित केला असल्याचे सांगितले. बेरोजगारीमुळे त्रस्त झालेल्या युवकांना नोकर्‍यांची आवश्यकता आहे. त्यासाठी सरकारने ठोस पावले उचलण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.