Tue, Mar 19, 2019 20:27होमपेज › Kolhapur › कोल्‍हापूर : गांधीनगरमधे साडेतीन हजारांसाठी मित्राचा खून

कोल्‍हापूर : गांधीनगरमधे साडेतीन हजारांसाठी मित्राचा खून

Published On: Jan 30 2018 12:19PM | Last Updated: Jan 31 2018 1:30AMगांधीनगर : वार्ताहर

मोबाईलचे पैसे देण्याच्या कारणावरून तिघाजणांनी त्यांचाच मित्र असलेल्या अतुल शिवाजी अंबुरे (वय 21, सध्या राहणार कोयना कॉलनी, गांधीनगर, मूळ रा. धारासूर, ता. गंगाखेड, जि. परभणी) याचा दगडाने ठेचून व काचांनी वार करून निर्घृणपणे खून केला. हा प्रकार गडमुडशिंगी हद्दीत सोमवारी (दि. 29) रात्री साडेअकराच्या सुमारास घडला. संजय बेले, दत्ता पांडुरंग दळवे (दोघेही सध्या रा. कोयना कॉलनी, गांधीनगर, मूळ रा. आंबेटाकळी, ता. गंगाखेड) व शिवाजी गणपतराव शिंदे (सध्या रा. कोयना कॉलनी, गांधीनगर, मूळ रा. टोले गल्‍ली, गंगाखेड) अशी संशयितांची नावे आहेत. शिवाजी शिंदे याला ताब्यात घेण्यात आले आहे. अन्य दोघे पसार झाले आहेत.

संजय बेले याचा मोबाईल हँडसेट तीन दिवसांपूर्वी अतुल अंबुरे याने साडेसात हजार रुपयांना विकत घेतला होता. त्यापैकी चार हजारांची रक्‍कम अतुलने दिली होती. सोमवारी सायंकाळी दुकानातील ड्युटी संपल्यानंतर शिवाजी शिंदे, दत्ता दळवे व संजय बेले यांच्यासमवेत अतुल पार्टीसाठी गेला. तेथे दारूच्या नशेत मोबाईलच्या पैशांवरून अतुलबरोबर हे तिघे भांडू लागले. वादावादीचे रूपांतर मारामारीत झाले. 

संजय बेले, दत्ता दळवे, शिवाजी शिंदे यांनी काचांनी, दगडाने मारहाण केली. अतुलच्या पाठीवर, चेहर्‍यावर काचांच्या तुकड्यांनी सपासप वार केले. गळ्यावर वर्मी घाव बसल्याने अतुलचा मृत्यू झाला.

दरम्यान, अतुलचा आत्तेभाऊ दत्ता गोविंद कदम (रा. वाघुडे वसाहत, गडमुडशिंगी) याला त्याचा मित्र राम कातुरे (रा. गांधीनगर) याचा फोन आला. अतुलचे चावला वाईन्स दुकानाच्या मागे वंदना फटाका गोदामाजवळ भांडण झाल्याचे त्याने सांगितले. कातुरे मित्रांसमवेत कदम याच्या घरी गेला. त्यावेळी त्याने अतुलचे, माझे, दत्ता दळवे व संजय बेले यांच्याशी भांडण झाले असून, अजूनही बेले व दळवे अतुलला गोदामाजवळ मारहाण करत आहेत, असे सांगितले. कातरे, कदम व त्यांचे मित्र अतुलचा शोध घेण्यासाठी निघाले. गोदामाजवळ पोहोचताच दळवे व बेले पळून गेले. तेथेच अतुलचा मृतदेह त्यांना दिसून आला.

दरम्यान, गांधीनगरचे सहायक पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण घटनास्थळी आले. चव्हाण यांनी शिवाजी शिंदे याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले. याबाबतची फिर्याद अतुलचा आत्तेभाऊ दत्ता गोविंद कदम याने गांधीनगर पोलिस ठाण्यात दिली.

घटनास्थळी शाहूवाडीचे उपविभागीय पोलिस अधिकारी आर. आर. पाटील, करवीरचे उपविभागीय अधिकारी सूरज गुरव यांनी रात्री अडीच वाजता भेट देऊन पाहणी केली.