होमपेज › Kolhapur › बागल चौकात तरुणाचा खून

बागल चौकात तरुणाचा खून

Published On: Dec 03 2017 1:29AM | Last Updated: Dec 03 2017 1:11AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

पत्नीची छेड काढत असल्याच्या रागातून अनिल घावडे (रा. बागल चौक) या तरुणाने समीर बाबासो मुजावर (वय 30, रा. सुभाषनगर चौक) याला भोसकले. वार वर्मी लागल्याने समीरचा मृत्यू झाला. समीर मुजावरला भोसकल्यानंतर अनिल आणि त्याच्या मित्रानेच सीपीआर रुग्णालयात दाखल केले. संशयित अनिल धावडे याला पोलिसांनी ताब्यात घेतले.

अधिक माहिती अशी, अनिल धावडे याची पत्नी एका जीममध्ये ट्रेनर म्हणून जात होती. या ठिकाणी समीरची तिच्याशी ओळख झाली. समीर एकतर्फी प्रेमातून तिची वारंवार छेड काढत होता. तीन वर्षांपूर्वी अनिल धावडे आणि समीर यांच्यात याच कारणावरून वाद झाला होता.  यानंतरही समीर पत्नीची वारंवार छेड काढत असल्याचे अनिलला समजले होते.

शनिवारी सकाळी समीर मुजावर रागाच्या भरात मित्र महेश पोवार याला घेऊन अनिल याच्या घरासमोर आला. यावेळी त्यांच्यात वाद झाला. रागाच्या भरात अनिलने घरातील चाकू आणून समीरला राहत्या घराच्या दारातच भोसकले.अनिल याला सीपीआर चौकीतील हवालदार पी. के. जाधव व कृष्णात काकडे यांनी विचारणा केली असता, त्याने भोसकल्याची कबुली दिली. प्रसंगावधानता दाखवत दोघांनी चौकीचा दरवाजा बंद करून त्याला थांबवून ठेवले. काही वेळातच लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक तानाजी सावंत संशयिताला घेऊन गेले. यानंतर पंधरा ते वीस मिनिटांनी संशयिताची चौकशी करत शाहूपुरी पोलिस सीपीआरमध्ये पोहोचले. समीर मुजावरने पाच वर्षांपूर्वी सफियाशी प्रेमविवाह केला. त्याला रिया नावाची तीन वर्षांची मुलगी आहे. खुनाच्या घटनेने समीरचे कुटुंब उद्ध्वस्त झाले.

नातेवाईकांचा आक्रोश

समीरवर हल्ला झाल्याची माहिती मिळताच नातेवाईक सीपीआरमध्ये जमले. समीरचा मित्रपरिवारही मोठा आहे. समीरचा मृत्यू झाल्याची बातमी समजताच पत्नी, आई व नातेवाईकांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.