Wed, Nov 14, 2018 03:41



होमपेज › Kolhapur › कोल्हापूर : आरक्षणासाठी कणेरीवाडीच्या तरुणाची आत्महत्या

कोल्हापूर : आरक्षणासाठी तरुणाची आत्महत्या

Published On: Aug 05 2018 2:53PM | Last Updated: Aug 06 2018 1:24AM



कोल्हापूर / उजळाईवाडी : प्रतिनिधी

मराठा आरक्षणासाठी तरुणांच्या आत्महत्येचे लोण रविवारी कोल्हापुरातही पोहोचले. कणेरीवाडी (ता. करवीर) येथील विनायक परशराम गुदगी (वय 27, मूळ रा. दड्डी, ता. हुक्केरी) या तरुणाने रविवारी आपल्या राहत्या घरी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास गळफास लावून घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. 

या घटनेची माहिती कळताच, त्याचे तीव्र पडसाद शहरासह ग्रामीण भागातही उमटले. दसरा चौक येथे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने रास्ता रोको करण्यात आला. तसेच विनायकला श्रद्धांंजली वाहण्यात आली. दसरा चौकातील पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आली. त्यामुळे दसरा चौकाला पोलिस छावणीचे स्वरूप आले होते. कणेरीवाडी येथेही पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या घटनेच्या निषेधार्थ सोमवारी कणेरीवाडी बंदची हाक देण्यात आली आहे.

विनायकला श्रद्धांजली वाहण्यासाठी सोमवारी सकाळी 11 वाजता दसरा चौकात शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे.

आंदोलनात सहभाग

परशराम गुदगी मूळचे कर्नाटकातील दड्डी गावचे. कामानिमित्त ते कोल्हापुरात आले व स्थायिक झाले. कणेरीवाडी येथे पत्नी व दोन मुलांसह ते राहतात. विनायक हा त्यांचा मोठा मुलगा. बारावीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर त्याने डिप्लोमा पूर्ण केला. त्यानंतर तोही गोकुळ शिरगाव येथील एका खासगी कंपनीत काम करत होता. मराठा आरक्षणासाठी संपूर्ण जिल्ह्यात आंदोलन सुरू आहे. कणेरीवाडी पंचक्रोशीतील गावांच्या वतीने सकल मराठा समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनात विनायक सहभागी झाला होता.

गळफास घेऊन संपवले जीवन

विनायकला चांगली नोकरी मिळत नसल्याने तो नैराश्येत होता. आई, वडील कामानिमित्त बाहेर गेले होते. त्यामुळे दोघे भाऊच घरात होते. भाऊ प्रमोद बाथरूमला गेल्याने विनायक घरी एकटाच होता. घरात कोणीच नसल्याचे पाहून साडेबारा वाजण्याच्या सुमारास विनायकने दार बंद करून घेतले व घरातच गळफास लावून घेतला. बाथरूमला जाऊन येईपर्यंत भाऊ विनायक असे काही तरी करेेल, याची यत्किंचितही कल्पना प्रमोदला नव्हती. बाथरूममधून आल्यानंतर त्याला विनायकने साडीने तुळईला गळफास लावून घेतल्याचे दिसले. तसाच ओरडत तो घराबाहेर आला. त्यामुळे आजूबाजूचे लोक जमा झाले.

लोकांच्या मदतीने विनायकला खाली उतरविण्यात आले. या घटनेची माहिती वार्‍यासारखी गावात पसरली. त्याला उपचारासाठी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत व त्यांच्या सहकार्‍यांनी तत्काळ सीपीआरला नेले; पण उपचारापूर्वीच त्याचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. घटनेची माहिती कळताच तरुण विनायकच्या घराकडे धाव घेऊ लागले.

सीपीआरमध्ये गर्दी ः तणाव

विनायकला सीपीआरमध्ये नेल्याचे समजताच ग्रामस्थ आणि मित्रपरिवाराने सीपीआरकडे धाव घेतली. या घटनेची बातमी शहरातही वार्‍यासारखी पसरली. विनायकचा मृतदेह सीपीआरमध्ये आणल्याचे समजताच, सकल मराठा आंदोलनातील कार्यकर्त्यांसह शहरवासीयांची गर्दी सीपीआर आवारात उसळली. या ठिकाणी मोठा पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. दुपारी चारच्या सुमारास विनायकचा मृतदेह उत्तरीय तपासणीनंतर शवागृहातून हलविण्यात आला. अडीच तासांहून अधिकवेळ सीपीआरमध्ये तणावाचे वातावरण होते.

या ठिकाणी गुदगी कुटुंबीयांसह कणेरीवाडीचे ग्रामस्थ, विनायकचा मित्रपरिवार उपस्थित होता. विनायकचे वडील व भावाला नातेवाईकांनी सावरण्याचा प्रयत्न केला; पण दोघांनाही मोठा मानसिक धक्का बसल्याने दोघेही सुन्न झाले होते. मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, सकल मराठा समाजाचे दिलीप देसाई, इंद्रजित सावंत, सचिन तोडकर, जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत, हर्षल सुर्वे, जयकुमार शिंदे, स्वप्निल पार्टे, अवधूत पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते सीपीआरमध्ये जमले.

सीपीआरमध्ये मोठा बंदोबस्त

पोलिस प्रशासनाने खबरदारीसाठी जलदकृती दलाच्या तुकडीसह मोठा पोलिस बंदोबस्त सीपीआरमध्ये तैनात केला. उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर, पोलिस निरीक्षक वसंत बाबर, सुनील पाटील, तानाजी सावंत शवागृहाबाहेर थांबून होते.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांकडून सांत्वन

राज्याचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी शवागृहाबाहेर विनायकचे वडील परशराम गुदगी यांची भेट घेतली. गुदगी कुटुंबीयांचे सांत्वन करून त्यांना धीर दिला. यावेळी ऋतुराज पाटील, राहुल पाटील यांनीही गुदगी कुटुंबीयांचे सांत्वन करून मदतीचे आश्‍वासन दिले.

कार्यकर्ते संतप्त

शवागृहाबाहेर पोलिस बंदोबस्त बोलावण्यात आल्याने सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते संतप्त बनले. आम्ही काही दंगा करण्यासाठी जमलेलो नाही. आमचा भाऊ गेला आहे. आम्हाला अटक करण्यासाठी पोलिस बोलावले आहेत का, असे सुनावले. यावरून शहर उपअधीक्षक डॉ. अमृतकर आणि कार्यकर्त्यांमध्ये वादावादी झाली. दुपारी साडेतीनच्या सुमारास शवविच्छेदनानंतर रुग्णवाहिकेतून पार्थिव दसरा चौकाकडे रवाना झाला. सीपीआरमधून दसरा चौकापर्यंत रुग्णवाहिका आणण्यात आली. दसरा चौकात विनायकच्या पार्थिवाला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी ‘विनायक गुदगी अमर रहे’, अशा घोषणा देण्यात आल्या.

दसरा चौकात रास्ता रोको

दरम्यान, मराठा आरक्षणासाठी विनायकने आत्महत्या केल्याची बातमी समजताच, त्याचे तीव्र पडसाद शहरात उमटू लागले. गटागटाने तरुण दसरा चौक येथे सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनाच्या ठिकाणी एकत्र येऊ लागले. पोलिसांनाही या घटनेची माहिती कळताच, त्यांनी दसरा चौकातील बंदोबस्तात प्रचंड वाढ केली. या घटनेचा निषेध करण्यासाठी दसरा चौकात रास्ता रोको करण्यात आला. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बराचवेळ ठप्प झाली होती.

बेरोजगारीतून नैराश्य

माझा मुलगा विनायक नोकरीच्या शोधात होता. गेल्या दोन महिन्यांपासून तो घरीच होता. नोकरी नसल्यामुळे तो निराश होता. या नैराश्यातूनच त्याने आत्महत्या केल्याचा जबाब विनायक गुदगीचे वडील परशराम व लहान भाऊ प्रमोद यांनी पोलिसांकडे नोंदवला आहे.

मातेचा हंबरडा : आज कणेरीवाडी बंद

विनायकचा मृतदेह गावात येताच ‘विनायक अमर रहे’, ‘एक मराठा, लाख मराठा’च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. यावेळी विनायकला श्रद्धांजली वाहण्यात आली. या घटनेबद्दल शोक व्यक्त करून सोमवारी कणेरीवाडी बंदची हाक देण्यात आली. यानंतर विनायकचा मृतदेह त्याच्या दड्डी या मूळ गावी नेण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य सरिता खोत, पोलिस पाटील शिवाजी मोरे, सरपंच शोभा खोत, विनोद खोत, प्रदीप केसरकर, अजित मोरे, रवी मोरे तसेच परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.

दड्डी येथे अंत्यसंस्कार

मराठा आरक्षणाच्या मागणीवरून गळफास लावून घेऊन कणेरीवाडी येथे आत्महत्या केलेल्या विनायकवर त्याचे मूळ गाव दड्डी (ता. हुक्केरी) येथे साश्रूपूर्ण वातावरणात सायंकाळी सात वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. गावात शांततापूर्ण वातावरण आहे.

मृतदेहासोबत गोकुळ शिरगाव येथील पोलिस ठाण्याचे पथक गावात सायंकाळपर्यंत होते. विनायकच्या पश्‍चात लहान भाऊ प्रमोद, आई, वडील,  काका व अन्य नातेवाईक असा परिवार आहे. विनायक याचे कुटुंबीय गेल्या 30 वर्षांपासून कणेरीवाडीत स्थायिक आहे. त्याने 12 वी पर्यंतचे शिक्षण घेतले असून, गेली तीन वर्षे तो नोकरीसाठी भटकत होता. मराठा आरक्षण न मिळाल्यामुळे तो निराश होता.