Sat, Apr 20, 2019 23:53होमपेज › Kolhapur › बहिणीने आपला मोबाईल घेतल्याच्या रागातून भावाची आत्महत्या

बहिणीने आपला मोबाईल घेतल्याच्या रागातून भावाची आत्महत्या

Published On: Aug 18 2018 1:21AM | Last Updated: Aug 18 2018 1:14AMकोल्हापूर : प्रतिनिधी

आपला मोबाईल बहिणीने घेतला, या रागातून भावाने कीटकनाशक पिऊन आत्महत्या केली. या हृदयद्रावक प्रकाराने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. मनाला चटका लावणार्‍या घटनेमुळे गडमुडशिंगी (ता. करवीर) परिसरात हळहळ व्यक्‍त होत आहे. तुषार बाळासाहेब अवघडे (वय 18) असे दुर्दैवी मुलाचे नाव आहे.

मोलमजुरीसह पेंटिंगची कामे करून कुटुंबीयाचा उदरनिर्वाह करणार्‍या बाळासाहेब अवघडे यांना दोन मुले आणि एक कन्या, अशी तीन अपत्ये. तुषार थोरला मुलगा. मित्रांमध्ये वावरत असताना स्वत:कडेही मोबाईल असावा, अशी त्याची इच्छा होती. मात्र, आर्थिक परिस्थितीमुळे मोबाईल खरेदी करणे त्याला शक्य नव्हते. काही दिवस त्याने वडिलांसमवेत, तर रात्री अन्य ठिकाणची पडेल ती कामे करून चार दिवसांपूर्वी नवा मोबाईल खरेदी केला.

मोठ्या भावाने घेतलेल्या नव्या मोबाईलचे त्याच्या लहान बहिणीला खूप अप्रूप. तिने दि. 15 ऑगस्टला सकाळी भावाच्या खिशातील मोबाईल काढून घेतला. आनंदाच्या भरात बहिणीने भावाने घेतलेला मोबाईल सार्‍यांना दाखविला. मला न विचारता मोबाईल का घेतलास, या कारणातून भावंडांत वाद झाला. संतप्त तुषार बहिणीवर ओरडला. रागात बहिणीला चापटही दिली.

या घटनेमुळे आई, वडील  तुषारला रागावले. हट्टी स्वभावाच्या मुलाने हा प्रकार फारच मनावर घेतला. या दिवशी सायंकाळी तो घरापासून काही अंतरावर माळावर गेला. तेथेच कीटकनाशक प्राशन केले. हा प्रकार नातेवाईक, मित्रांच्या निदर्शनास येताच त्यांनी गंभीर अवस्थेत त्याला सीपीआरमध्ये हलविले.

उपचार सुरू असतानाच तुषारचा दुपारी मृत्यू झाला. मुलाच्या मृत्यूची बातमी कानावर पडताच उपस्थित आई, वडिलांसह दहावीत शिक्षण घेणार्‍या बहिणीवर दु:खाचा डोंगरच कोसळला. तुषारच्या मृत्यूची बातमी समजताच नातेवाईकांसह त्याच्या मित्रांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली होती.