Sun, Mar 24, 2019 16:44होमपेज › Kolhapur › बेदरकार दुचाकीस्वाराला तरुणीकडून चोप

बेदरकार दुचाकीस्वाराला तरुणीकडून चोप

Published On: Mar 14 2018 12:52AM | Last Updated: Mar 14 2018 12:13AMकोल्हापूर : प्रतिनिधी

मिरजकर तिकटी परिसरात मंगळवारी सकाळी बेदरकारपणे दुचाकी चालविणार्‍या तरुणाला भरचौकात अडवून तरुणीने चोप दिला. घडलेल्या या प्रकाराचे चित्रीकरण सीसीटीव्हीत कैद झाले असून, या तरुणीच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

या तरुणीच्या मोपेडला अत्यंत धोकादायकरीत्या व भरधाव कट मारून एक तरुण खासबाग मैदानाकडे आला. या तरुणीने त्याचा पाठलाग करून त्याला खासबाग बसस्टॉपजवळ अडविले. मोपेडवरून उतरून तिने थेट या तरुणाच्या कानशिलात लगावली. त्याचा हात पिरगळून याबाबत जाब विचारला. तरुणाने आणि त्याच्या मित्राने या तरुणीची माफी मागितली; पण ती तरुणी अत्यंत संतापलेली होती. हा प्रकार पाहताच अनेक नागरिक घटनास्थळी जमा झाले. राजवाडा पोलिसांसह वाहतूक शाखेच्या पोलिसांना या ठिकाणी बोलावण्यात आले. वाहतूक शाखेच्या पोलिसांनी तरुणावर दंडात्मक कारवाई करून सोडून दिले. या सर्वप्रकाराचे चित्रीकरण येथील इमारतीत असणार्‍या सीसीटीव्हीत कैद झाले. हे चित्रीकरण प्रसार माध्यमांमुळे सर्वत्र पसरले. महिलांची छेड काढण्याचे प्रकार घडत असताना या तरुणीने दाखविलेल्या धाडसाचे कौतुक होत आहे.