Sat, Jun 06, 2020 06:20होमपेज › Kolhapur › तरुणास मारहाण; दोन पोलिस निलंबित

तरुणास मारहाण; दोन पोलिस निलंबित

Published On: May 09 2018 2:04AM | Last Updated: May 09 2018 12:47AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

दाभोळकर कॉर्नर येथील पादचारी उड्डाणपुलाजवळ मार्शल मुकुंद गर्दे याला झालेल्या मारहाणप्रकरणी पोलिस कर्मचारी प्रवीण बाळासाहेब काळे व संदीप विठ्ठलराव जाधव यांना निलंबित करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी दिले. हॉटेल अनुग्रह येथील सीसीटीव्ही फुटेजमध्ये पोलिस नाईक प्रवीण काळे, संदीप जाधव यांनी गर्दे याला मारहाण केल्याचे दिसून आले. या घटनेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर कारवाई करण्यात आली. 

रविवारी रात्री मार्शल गर्दे आपल्या मित्रांसोबत बारशाचा कार्यक्रम आटोपून घरी निघाला होता. दाभोळकर कॉर्नरनजीक गाडीतून उतरणार्‍या पोलिस नाईक प्रवीण काळे याला गर्दे याने, ‘साहेब, तुमचा मोबाईल पडला आहे,’ असे सांगितले. यावर संतापलेल्या काळे याने, ‘तुला रखवाली करायला ठेवला आहे का,’ अशी विचारणा करत कानशिलात लगावली होती. संदीप जाधव याने आम्ही पोलिस असल्याचे सांगितले. फायबर काठीनेही मारहाण झाली.

पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी या घटनेची दखल घेऊन चौकशी अहवाल देण्याचे आदेश शहर उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर व पोलिस निरीक्षक संजय मोरे यांना दिले होते. फुटेजमध्ये पोलिस कर्मचारी प्रवीण काळे याने सर्वप्रथम गर्देसोबत हुज्जत घातली. तसेच त्याला मारहाण करतानाचे दिसून आले. हाणामारीची माहिती मिळताच शाहूपुरी पोलिस ठाण्यातील आणखीन कुमक दाभोळकर कॉर्नर येथे मागविण्यात आली. या पोलिसांनी गर्देला ओढत पोलिस ठाण्याकडे नेण्याचा प्रयत्न केला. यावेळी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. या गर्दीतून मार्शल गर्दे बाजूला निघून गेला. त्याच्या मित्रांनी आणि नातेवाइकांनी त्याला उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल केले होते. रुग्णालयाच्या आवारातही मोठा तणाव निर्माण झाला होता. 

पोलिस कर्मचार्‍यांनी मद्य प्राशन केले होते का? याचा अहवाल अद्याप मिळालेला नाही. मार्शल गर्दे याने दिलेल्या फिर्यादीवरून 3 पोलिसांवर गुन्हा दाखल करण्यात आला. तर पोलिस कर्मचारी संदीप जाधव यानेही जमावाकडून दगडफेक झाल्याची फिर्याद दिल्याने परस्परविरोधी गुन्हे दाखल आहेत.

 

Tags :  kolhapur police, young boy