Tue, Apr 23, 2019 14:25होमपेज › Kolhapur › यावर्षी 80 लाख टन कच्ची साखर निर्यात आवश्यक

यावर्षी 80 लाख टन कच्ची साखर निर्यात आवश्यक

Published On: Aug 15 2018 1:23AM | Last Updated: Aug 15 2018 12:31AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

यावर्षीच्या साखर हंगामात किमान 80 लाख टन कच्ची साखर निर्यात झाल्याशिवाय देशांतर्गत शिल्लक साखरेचा प्रश्‍न मिटणार नाही. या मागणीसाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्याचा निर्णय मंगळवारी जिल्हा बँकेत झालेल्या कोल्हापूर, सांगलीतील कारखाना प्रतिनिधी व भारतीय आयात-निर्यात महामंडळाच्या पदाधिकार्‍यांच्या बैठकीत झाला.

साखरेचा हमीभाव प्रतिक्‍विंटल 2,900 रुपये निश्‍चित असूनही यावर्षी साखरेचा पाहिजे तेवढा उठाव झालेला नाही. आज महाराष्ट्रातच जवळपास 75 लाख टन साखर शिल्लक आहे. येणार्‍या हंगामात पुन्हा पांढरी साखरच तयार झाली तर किमान 150 लाख टन साखर शिल्लक राहण्याचा धोका आहे. या पार्श्‍वभूमीवर येणार्‍या हंगामात सुरुवातीपासूनच कच्ची साखर तयार करून निर्यातीला परवानगी मिळावी, याविषयी चर्चा करण्यासाठी बैठक झाली. बैठकीला महामंडळाचे राजेश मिश्रा व विश्‍वनाथ हे दोन प्रतिनिधी उपस्थित होते. 

जगाच्या पाठीवर निर्यात होणार्‍या एकूण साखरेपैकी 75 टक्के साखर कच्ची असते. उर्वरित 25 टक्के साखर रिफायनरीतून गेलेली असते, त्यात भारतीय साखरेचा वाटा अवघा दहा टक्के असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. त्यामुळे यावर्षी सुरुवातीला कच्ची साखर तयार करून ती निर्यात केली पाहिजे, असेही सांगण्यात आले. त्यातही ब्राझीलची कच्ची साखर बाजारात येण्यापूर्वी हा निर्णय होणे आवश्यक असल्याने त्याचा पाठपुरावा केंद्र सरकारकडे करण्याचा निर्णय बैठकीत झाला. कच्ची साखर निर्यातीत कारखान्यांना जरूर तोटा आहे; पण धाडस करून हा निर्णय घेतला पाहिजे, असे मत व्यक्‍त करण्यात आले. एका कारखान्याने कच्ची साखर तयार केली; पण निर्यातीचा निर्णय न झाल्याने अजूनही कारखान्याच्या गोदामात ही साखर पडून असल्याची वस्तुस्थिती बैठकीत मांडण्यात आली. ब्राझीलची साखर बाजारात आली तर भारतीय साखरेला ग्राहकही मिळणार नसल्याचा धोकाही व्यक्‍त करण्यात आला. त्यामुळे शासनाने तातडीने हा निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली. 

बैठकीत ‘जवाहर’चे कार्यकारी संचालक मनोहर जोशी, ‘राजाराम’चे पी. जी. मेढे व ए. व्ही. निकम, डी. वाय. पाटील कारखान्याचे पाटील, सह्याद्री कारखान्याचे आबा पाटील यांनी मते मांडली. देशातून कच्च्या साखरेच्या निर्यातीचा निर्णय झाल्यास पश्‍चिम महाराष्ट्रातील कारखान्यांसाठी सोयीस्कर असलेल्या जयगड व गोवा बंदराची भारतीय आयात-निर्यात महामंडळाच्या पदाधिकार्‍यांकडून उद्या पाहणी करण्यात येणार आहे. याशिवाय कर्नाटकातील कांडला व मुंबई बंदरावर जाऊनही हे पदाधिकारी पाहणी करणार आहेत. 

16 ऑगस्टला अध्यक्षांची बैठक

शिल्‍लक साखरेचा धोका कारखान्यांच्या अध्यक्षांनाही समजावा, त्यांच्याकडून कच्च्या साखरेच्या निर्यातीबाबत शासनाकडे पाठपुरावा व्हावा, यासाठी कोल्हापूरसह सांगली जिल्ह्यातील साखर कारखाना अध्यक्षांची बैठक गुरुवारी (दि. 16) जिल्हा बँकेत बोलावण्यात आली आहे.