Thu, Jun 27, 2019 01:32होमपेज › Kolhapur › तांबड्या मातीतून उमलतील सुवर्णपदके

तांबड्या मातीतून उमलतील सुवर्णपदके

Published On: Jan 11 2018 1:07AM | Last Updated: Jan 10 2018 11:49PM

बुकमार्क करा
कोल्हापूर : एकनाथ नाईक

गेल्या काही वर्षांत महाराष्ट्राच्या काही कुस्ती संघटकांनी कुस्तीला वेगळे वळण दिले. वास्तविक, माती आणि गादी या एकाच नाण्याच्या दोन बाजू; पण त्या जणू दोन परस्परविरोधी कुस्त्या असल्याचा अकारण बुद्धिभेद केला गेला आणि मातीच्या कुस्तीला उतरती कळा लागली. मातीवरची कुस्ती चितपट झाली, याची जागा मॅटने घेतली. कुस्तीपंढरी कोल्हापुरात हाताच्या बोटावर मोजण्या इतक्याच तालमींत आखडे आहेत. तेथील लाल मातीत नियमित शड्डू घुमतो आहे. या तांबड्या मातीतूनच सुवर्णपदके उमलतील. जिल्ह्यात 300 हून अधिक तालमी आहेत. येथेही हाताच्या बोटावर मोजण्या इतक्याच गावांतील तालमींत नियमित शड्डू घुमतो. इतर तालमींची जागा तरुण मंडळे, दूध संस्था, सेवा सोसयटींच्या कार्यालयाने घेतली आहे. 

जिल्ह्यातील कुंभी-कासारी, भोगावती कारखाना, वारणा कारखाना, जवाहर कारखाना, सदाशिवराव मंडलिक कारखाना, बिद्री सहकारी साखर कारखाना यांनी ऊस उत्पादक सभासदांच्या मुलांना मानधनधारक कुस्ती स्पर्धेच्या रूपाने बळ दिले; पण जत्रेतील कुस्ती मैदाने पूर्णत: गायब झाली आहेत.  

 माजी मंत्री विनय कोरे,

कै. सदाशिवराव मंडलिक सहकारी साखर कारखाना व कोल्हापूर महानगरपालिकेने बंद पडलेली महापौर केसरी कुस्ती स्पर्धा पुन्हा सुरू करून मल्लांना बळ देण्याचा चांगला प्रयत्न केला आहे. गोकुळ दूध संघ व आमदार सतेज पाटील यांनीदेखील डॉ. डी. वाय. पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कुस्तीचे मैदान भरवून या कलेला प्रोत्साहन दिले. मुरगूडला रणजित पाटील यांनीही नुकतेच भव्य मैदान भरवले होते. यासारखी इतरांनी कुस्तीची मैदाने भरवून सातत्य ठेवल्यास सुस्ती आलेल्या कुस्तीची मरगळ दूर होईल. 

महिला कुस्तीगिरांनी कुस्तीपंढरीचे नाव सातासमुद्रापार पोहोचवले आहे. यात रेश्मा माने, नंदिनी साळोखे, स्वाती शिंदे यांची नावे आघाडीवर आहेत. पुरुषांत सचिन जामदार, विजय पाटील, कौतुक डाफळे, महेश वरुटे, उदयराज पाटील, विक्रम कुराडे, संग्राम पाटील, धनाजी पाटील, अजित पाटील, ओंकार भातमारे, अरुण बोंगार्डे यांच्यासह अनेक मल्ल कुस्तीला सुवर्ण झाळाळी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहेत.