Fri, Apr 26, 2019 15:17होमपेज › Kolhapur › महाराष्ट्रातील कुस्तीला ‘राजकारणा’ची कीड! 

महाराष्ट्रातील कुस्तीला ‘राजकारणा’ची कीड! 

Published On: Jan 12 2018 8:41AM | Last Updated: Jan 12 2018 12:09AM

बुकमार्क करा
कोल्हापूर : एकनाथ नाईक 

महाराष्ट्रातील कुस्तीला राजकारणाची कीड लागली असून अनेक नामवंत मल्लांच्यावर अन्याय होत  आहे. महाराष्ट्र केसरी किताबाची स्पर्धा राज्यातील कुस्ती क्षेत्रातील सर्वोच्य प्रतिष्ठेची स्पर्धा समजली जाते.
आंतरराष्ट्रीय स्पर्धेला जाता आले नाही तरी चालेल, पण हा किताब काहीही करून जिंकायचाच याच ईर्षेने मल्ल सराव करत असतात. पण, गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रातील ‘कुस्ती’ला राजकारणाचे ग्रहण लागले आहे. दिवसेंदिवस हे ग्रहण वाढत असून चांगले मल्ल या कुस्तीतून शरीर कमवून किताबा’विनाच बाहेर पडत आहेत. 

कुस्ती पंढरी म्हणून कोल्हापूर जिल्ह्याने आपली ओळख निर्माण केली आहे. अनेक नामांकित मल्ल कोल्हापूरच्या लाल मातीत घडले.अनेकांनी नाव कमविले, पण गेल्या काही वर्षांपासून कुस्तीत राजकारण शिरल्याने कुस्तीत मैदानाबाहेरच चितपट होत आहे. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असताना देखील अनेकांचे आई-वडील स्वत:च पोरगं पैलवान व्हाव म्हणून हाडाची काडं करतात, पण कुस्तीतील राजकारणामुळे त्यांचे दिव्य स्वप्न अपुरेच राहते.

पंजाब, हरियाणा, दिल्लीकडील पहिलवान जन्माला येतो, तो आंतरराष्ट्रीय त्यातही ऑलिम्पिक क्रीडा व जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत किमान प्रतिनिधित्व करण्यासाठी. येथील नामांकित तालमीत परराज्यातील मल्ल सरावासाठी येतात. वस्तादांनी कुस्तीसाठी दिलेले धडे चांगल्या प्रकारे ते गिरवतात आणि कुस्तीमध्ये नाव करतात. येथील मल्लांचे ध्येय उच्च किताबाचे असते. तर येथील मल्ल महाराष्ट्र केसरी आणि स्थानिक पातळीवरील कुस्तीतच गुरफडले आहेत.

ऑलिम्पिक किंवा महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेची तयारी करायची म्हटले तर बडे पैलवान, वस्ताद आणि कुस्तीतलं राजकारण आडवे येते.त्यामुळेच दर्जेदार मल्लांची ‘डाळ’ शिजत नाही. खडतर परिस्थितीवर मात करून राम सारंग, काका पवार आणि राहुल आवारे यांनी ऑलिम्पिकचे पदक मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, पण त्यांचे हे स्वप्न स्वप्नच राहिले. 

वस्तादांनी नवोदित मल्लांना तंत्रशुद्ध मार्गदर्शन करून मल्ल घडविण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद व विविध संघटनांनी राजकारणाला तिलांजली देऊन कुस्तीच्या विकासासाठी एकत्र आले पाहिजे. तर बलदंड देहयष्टी असले मल्ल तयार होतील.

वाढत्या महागाईची झळ मल्लाना बसल्याने थंडाई, फळे, मासांहार देखील महागला आहे.पोटाला चिमटा देऊ अनेक आई-वडील स्वत:च्या पाल्याला तालमीत घालत आहेत. महिला देखील कुस्तीत चमकदार कामगिरी करताना दिसत आहेत. त्यामुळे कुस्ती संघटनांनी एकजूट दाखवून ‘मल्ल’ विद्येसाठी एकसंध झटणे गरजेचे आहे.