Sat, Mar 23, 2019 16:42होमपेज › Kolhapur › जागतिक बालकामगार विरोधी दिन : हरवलेले बालपण पुन्हा मिळेल का?

जागतिक बालकामगार विरोधी दिन : हरवलेले बालपण पुन्हा मिळेल का?

Published On: Jun 12 2018 12:51AM | Last Updated: Jun 11 2018 11:49PMकोल्हापूर : विजय पाटील 

मध्यवर्ती बसस्थानक परिसरात काही हॉटेलमध्ये ग्राहकांच्या आदेशानुसार भजी व चहा देणारी लहान पोरं आहेत. पंक्‍चर काढणार्‍या व्यवसायात अशीच कोवळी मुले पदोपदी दिसतात. शेतमजुरीत कुटुंबासोबत राबताना बालकांचा टक्‍का जादा आहे. बांधकामासाठीही बालकामगारांचा सर्रास वापर दिसतो. बालकांबाबत कडक कायदे असूनही गरिबी, अशिक्षितपणामुळे हे प्रमाण संपूर्णपणे कमी करणे आव्हानात्मक बनले आहे. 

ज्या वयात मनसोक्‍त खेळायचे, बागडायचे, मित्रांबरोबर मस्ती करायची, खोड्या काढायच्या अशा कोवळ्या वयात काम करावे लागणार्‍यांचे हरवलेले बालपण पुन्हा कधीच मिळत नाही. मुले ही भविष्य असतात. त्यांचे बालपण कोमजणार असेल तर भविष्यही अंधकारमय असणार हे स्पष्ट आहे. 

कोल्हापूर जिल्ह्यात साखर कारखाने आणि गुर्‍हाळघरांची संख्या मोठी आहे. या हंगामाच्या काळात मोठ्या संख्येने बीड, उस्मानाबाद, लातूर, हिंगोली आदी परिसरातून ऊसतोड मजूर येतात. या ऊसतोड मजुरांसोबत त्यांचं अख्खं कुटुंब येते. या कुटुंबातील सर्रास लहान मुले बालकामगार म्हणून काम करत असतात. त्यांच्यासाठी असणार्‍या साखर शाळांमध्ये ते फारसे रमत नसल्याचे दिसून आले आहे. दुसर्‍या बाजूला  ग्रामीण भागातील बांधकाम क्षेत्रात बालकामगारांचे प्रमाण वाढू लागले आहे. हे बालकामगार परराज्यामधील असल्याचे दिसून येते. कचरावेचक या कामातही बालकांचे प्रमाण जास्त आहे. 

वडिलांची व्यसनाधिनता आणि गरिबी या दोन कारणांमुळे शिकण्याची इच्छा असूनही बहुतेक मुलांना बाल कामगार बनावे लागत असल्याचे वास्तव आहे. शिकण्यापेक्षा कोवळ्या खांद्यावर उदरनिर्वाह करण्याची जबाबदारी येऊन पडते. अशी मुले मग वयाची खोटी कागदपत्रे तयार करून काम करताना दिसतात. त्यांच्यासमोर दररोज पैसे मिळवणे हाच पर्याय खुला असतो. बालकामगार हा विषय बंद व्हावा म्हणून सरकारकडून विविध योजना राबवल्या जातात. त्याला यश येत असले तरी संपूर्णपणे हा उपक्रम यशस्वी होताना दिसत नाही. 

देशात 50 लाख बालकामगार

देशात सुमारे 50 लाख बालकामगारांची नोंद करण्यात आली आहे. यापैकी  महाराष्ट्रात 2 लाख 60 हजार 673 बालकामगार असल्याचे केंद्रीय श्रम आणि रोजगार विभागाची आकडेवारी सांगते.  देशातील एकूण बालकामगारांपैकी महाराष्ट्रात 5.23 टक्के बालकामगार असल्याचे यावरून दिसून येते. यामध्ये बालिकांची संख्याही लक्षणीय दिसून येते. सर्वात जास्त  बालकामगारांची संख्या उत्तर प्रदेशात आहे. या ठिकाणी बालकामगारांची टक्केवारी 35.62 टक्के इतकी आहे. पश्‍चिम बंगालमध्ये 11.06 टक्के बालकामगार आहेत. केरळमध्ये सर्वात कमी म्हणजे 0.5 टक्के बालकामगार आहेत. छत्तीसगढमध्ये हेच प्रमाण 0.23 टक्के तर तामिळनाडूमध्ये 0.34 टक्के असून दिल्‍लीमध्ये ही टक्केवारी 0.37 टक्के इतकी आहे.

बालकामगार म्हणजे?

14 वर्षांखालील जी मुले स्वत:च्या आणि आपल्या परिवाराच्या उदरनिर्वाहासाठी मोलमजुरी, रोजगार करतात. अशी मुले बालकामगार या वर्गात येतात. 12 जून हा दिवस देशात सर्वत्र बालकामगार विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो. बालकामगारांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरिता शासनाच्या श्रम व रोजगार मंत्रालयाच्या वतीने जिल्हास्तरावर राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत 9 ते 14 वयोगटातील धोकादायक  व्यवसायामध्ये काम करणार्‍या बालकामगारांची शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातात.  प्रकल्पाचा उद्देश हा बालकामगारांना त्यांच्या कामापासून परावृत्त करणे आणि त्यांना सुशिक्षित करणे हा आहे. यासाठी त्यांच्या पालकांचा आर्थिक स्तर उंचावणे, त्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे यासाठी प्रयत्न केले जातात.