Fri, Nov 16, 2018 08:42होमपेज › Kolhapur › ‘गोकुळ’ची प्रगती कौतुकास्पद : ब्रेसनॅन

‘गोकुळ’ची प्रगती कौतुकास्पद : ब्रेसनॅन

Published On: Feb 04 2018 1:50AM | Last Updated: Feb 04 2018 12:50AMकोल्हापूर : प्रतिनिधी

गोकुळने आपल्या कार्यक्षेत्रामध्ये आधुनिकतेची कास धरून विविध योजनांद्वारे सुरू ठेवलेली दुग्धव्यवसाय विकासाची प्रगती निश्‍चितच कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन जागतिक बँकेचे प्रतिनिधी एडवर्ड ब्रेसनॅन (अमेरिका) यांनी गोकुळला दिलेल्या भेटीप्रसंगी केले.

गोकुळचा जनावरांसाठी आहार संतुलन कार्यक्रम (आर.बी.पी.), बल्क कुलर योजना, गावपातळीवरील दूध संकलन व्यवस्था (व्ही.बी.एम.पी.एस.), स्तनदाह आजार (मस्टायटीस) प्रतिबंध कार्यक्रम यांसारखे कार्यक्रम गोकुळ आपल्या कार्यक्षेत्रात अत्यंत चांगल्या प्रकारे राबवत असल्याबद्दल ब्रेसनॅन यांनी समाधान व्यक्‍त केले. त्यांच्यासोबत हेलन लिटचे व तसेच एन. डी. डी. बी. चे प्रतिनिधी अनिल हातेकर, अरविंदकुमार, चंद्रशेखर ढाकोळे यांनी गोकुळच्या कार्यक्षेत्रातील नानीबाई चिखली, (ता. कागल) येथील मायक्रोट्रेनिंग सेंटर, गडमुडशिंगी येथे उभारण्यात येत असलेला चारावीट प्रकल्प व गोकुळ दूध प्रकल्पास भेट दिली. कामकाजाची माहिती घेतली. गोकुळ दूध प्रकल्प येथे संचालक व अधिकार्‍यांसमवेत झालेल्या बैठकीमध्ये गोकुळच्या सध्याच्या व भविष्यकालीन योजनांबद्दल चर्चा झाली. यानंतर चेअरमन विश्‍वास पाटील व ज्येष्ठ संचालकांच्या हस्ते गोकुळच्या वतीने या प्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला. 

याप्रसंगी ज्येष्ठ संचालक रणजितसिंह पाटील, रवींद्र आपटे, कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर, महाव्यवस्थापक आर. सी. शाह, डॉ.उदय मोगले, तसेच अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.