Fri, May 24, 2019 08:26होमपेज › Kolhapur › #Women’sDayबेरोजगारीवर ‘विजया’ यांचा विजय

#Women’sDayबेरोजगारीवर ‘विजया’ यांचा विजय

Published On: Mar 07 2018 7:51PM | Last Updated: Mar 08 2018 2:05AMकोल्हापूरः राजेंद्रकुमार चौगले

स्त्री प्रत्येक क्षेत्रात पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करतेय. स्त्री घराच्या चौकटीतून बाहेर पडलीय, तिचं स्वातंत्र्य ती जपतेय. पण आजच्या जगात वावरत असताना तिच्या समोरील समस्याही वाढल्या आहेत. अर्थात, समस्या कितीही असल्या तरी आजची स्त्री कर्तव्य नजरेआड करणारी नाही. वाटेवरती कितीही काचा असल्या तरी आयुष्यात काही करून दाखवण्याची जिद्द त्यांना त्यांच्या ध्येयापर्यंत निश्‍चितच घेऊन जाईल. याचीच प्रचिती कोल्हापूरातील खरी कॉर्नर रोडवर  एका रसवंतीगृह चालविणार्‍या महिलेकडून येत आहे. कागल तालुक्यातील शेंडूरच्या सौ. विजया  सागर तेली या उच्चविद्याविभूषित विवाहित महिलेने बेरोजगारीवर विजय मिळवण्याच्या प्रयत्नांची जागतिक महिलादिनानिमित्त घेतलेली दखल... 

एम.ए. बी.एड्(अर्थशास्त्र) आणि क्राफ्ट डीटीएड् अशा विविध पदवीधारक असलेल्या विजया यांनी पती सागर यांना संसाराला हातभार लागावा म्हणून उसाचा रस विक्री करण्याचा व्यवसाय सुरु केला. यानिमित्ताने त्या एक मुलगा, एक मुलगी व पतीसह कोल्हापूरात रहावयास आल्या. खरी कॉर्नर रोडवर न्यू इंग्लिश स्कूलच्या समोरील चौकात उभतयांनी सहा वर्षापूर्वी रसवंती गृह सुरु केले. यासाठी गावातील स्वतःच्या शेतामधील 92005 या जातीचा ऊस रसासाठी वापरण्यास सुरूवात केली. रसवंतीसाठी खास शिफारस करण्यात आलेल्या ऊसापेक्षा या उसाची गोडी जास्त असल्याने परिसरात या रसाला मागणी वाढू लागली. साधारणपणे आठ ते नऊ महिने या उसाचे गाळप करून विजया यांनी हजारोंची तृषा शांत केली.

यावेळी विजया स्वतः उसाच्या यंत्राच्या सहाय्याने गाळप करतात. यानंतर ऊस गाळप झाल्यानंतर त्याचे चिपाड इतस्ततः विखरू नये यासाठी त्यांनी यंत्रावर प्लास्टिकचे आवरण टाकलेले आढळून येते. परिणामी या ठिकाणी कमालीची स्वच्छता दिसून येते. 

याबाबत विजया म्हणतात, ‘‘मी उच्चविद्याविभूषित आहे, नोकरीसाठी विविध पदांसाठी स्पर्धापरीक्षांद्वारे प्रयत्न सुरु आहेत. तोपर्यंत पती सागर यांना व्यवसायामध्ये मदत व्हावी, आणि सुशिक्षित-बरोजगार असल्याचे शल्य विसरण्यासाठी मला माझ्या क्षमतेप्रमाणे जो काही सांसारिक भार उचलता येणे शक्य आहे तो या रसवंतीगृहाच्या माध्यमातून मी उचलण्याचा प्रयत्न करीत आहे. एक महिला ऊसयंत्र चालवित असल्याचे पाहून अनेकांनी केलेल्या कौतुकामुळे दिवसभर केलेल्या कष्टाचे चीज होते, अन् अभिमानही वाटतो.’’

‘‘भारतात पूर्वी महिलांवर अनेक निर्बंध लादले जायचे आणि स्त्रिया ते निमूटपणे सहन करायच्या. सध्याची भारतीय स्त्री मात्र बदलली आहे. ती बदल स्वीकारणारी आहे. पुरुषप्रधान समाजामध्येही ती आपलं स्थान बनवू पाहते. मग मी कशी स्वस्थ बसू? असा सवालही विजया यांनी उपस्थित केला. 

‘‘स्त्री ही पूर्वीही असुरक्षित होती. घरातच तिच्यावर अनेक अत्याचार होत होते. आता फक्त याबाबत जागरुकता निर्माण झाली आहे. यात मीडियाचा मोठा वाटा आहे. महिला दिन एक दिवस साजरा करण्यापेक्षा स्त्री-पुरुष समानतेचं मूल्य कायमस्वरूपी मनात रुजवायला हवं. शिक्षण यात नक्कीच महत्वाची भूमिका निभावू शकतं. समाजाची मानसिकता बदलणं गरजेचं आहे. अनेक पुरुषही स्त्रीयांच्या हक्कांसाठी लढा देताना आज आपण बघतो. हे कौतुकास्पद आहे.’’ असेही सौ. विजया यांनी सांगीतले. 

एकूणच जागतिकीकरणामुळे आजच्या स्त्रीमध्ये बदल झाले आहेत. समाजाची चौकट मोडण्यापेक्षा ती विस्तारून स्वतःचं स्थान निर्माण करण्यावर तिचा भर आहे. समाजाची मानसिकता मात्र अजूनही तीच आहे. आम्हाला पुरुषवर्गापेक्षा वरचढ व्हायचं नाही आणि आम्हाला विशेष वागणूक नकोय. तर आम्हांला समाजात समानता हवी आहे. माणूस म्हणून जगण्याचा अधिकार हवाय असेच आजच्या स्त्रीचं म्हणणं असल्याचे विजया यांच्या कामगिरीवरून अधोरेखित होत आहे.