Sat, Jul 20, 2019 09:33होमपेज › Kolhapur › कोल्हापुरातून धावली लेडिज स्पेशल एसटी (Video)

कोल्हापुरातून धावली लेडिज स्पेशल एसटी (Video)

Published On: Mar 08 2018 3:33PM | Last Updated: Mar 08 2018 1:29PMपूजा कदम, पुढारी ऑनलाईन

जागतिक महिला दिनानिमित्त राज्य परिवहन महामंडळाने महिलांसाठी खास भेट दिली आहे. महामंडळाच्या वतीने महिलांसाठी स्पेशल बस सोडण्यात येणार आहे. या बसमध्ये महिलांच्या सोयीसाठी महिला वाहकच असणार आहेत. या बसचा शुभारंभ आज करण्यात आला. कोल्हापूर ते सांगली अशी फक्त महिलांसाठी असलेली ही विशेष बस आजपासून महिलांच्या सेवेत दाखल झाली आहे.

महिलांनी प्रत्येक क्षेत्र काबीज केले आहे. कठीण प्रसंगांवर मात करून महिला यशस्वी घोडदौड करत आहेत. या महिलांना दिवसभराच्या प्रवासात अनेक कठीण प्रसंगांना तोंड द्यावे लागत होते. त्यामुळे अनेकींना रोजचा प्रवास नको वाटतो. त्यामुळे या लेडिज स्पेशन बसचे महिलांकडून जोरदार स्वागत करण्यात आले आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या कोषाध्यक्षा वैशाली क्षीरसागर यांच्या हस्ते या बसचे उद्घाटन करण्यात आले.

या बसच्या पहिल्याच फेरीत सहभागी झालेल्या प्रवासी महिलांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. देवस्थान समितीच्या कोषाध्यक्षा वैशाली क्षीरसागर यांनी स्वत: बसमध्ये जाऊन प्रवासी महिलांशी बातचीत केली. कामानिमित्त कोल्हापूर ते सांगली व सांगली ते कोल्हापूर असा दैनंदिन प्रवास करणाऱ्या अनेक महिला आहेत. महिलांसाठी असलेल्या ट्रेनप्रमाणेच महिला प्रवाशांसाठी कोल्हापूर व सांगली विभागांच्या वतीने ‘लेडीज स्पेशल’ विशेष एसटी बससेवा सुरू करण्यात आल्याने महिलांनी समाधान व्यक्त केले.

या वेळी नगरसेविका प्रतिज्ञा उत्तुरे, शिवसेना महिला आघाडी शहरप्रमुख मंगल साळोखे, गौरी माळदकर आदी महिला तथा एस. टी. महामंडळाच्या विधी अधिकारी तेजस्विनी साळोखे, विभागीय भांडार अधिकारी ओतारी, कोल्हापूर विभाग नियंत्रक शैलेंद्र शिवराम चव्हाण, आगार व्यवस्थापक सुनील जाधव, विभागीय कर्मचारी वर्ग अधिकारी येडके, कामगार अधिकारी प्रवीण पाटील, सुरक्षा व दक्षता अधिकारी घातमारे, विभागीय सांखिकी अधिकारी मुजावर, विभागीय लेखा अधिकारी देशपांडे आदी उपस्थित होत्या.

‘लेडीज स्पेशल’ची वेळ अशी 

कोल्हापूर बसस्थानक : सांगलीकडे सकाळी ९.१५ वा. व सायंकाळी ५.४५ वाजता

सांगली बसस्थानक : कोल्हापूरकडे सकाळी ९.१५ वा. व सायंकाळी ५.४५ वाजता