Mon, Dec 17, 2018 15:02होमपेज › Kolhapur › महिलादिनी स्त्री सन्मान, शक्तीचा जागर...

महिलादिनी स्त्री सन्मान, शक्तीचा जागर...

Published On: Mar 09 2018 1:34AM | Last Updated: Mar 09 2018 12:47AMकोल्हापूर : प्रतिनिधी

प्रबोधनात्मक देखावे.. चित्ररथ.. मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके करणार्‍या विद्यार्थिनी.. ढोल-ताशाच्या गजरात लेझीम व झांजपथक खेळणार्‍या शालेय मुली.. सोबतीला विविध रंगीत फेटे परिधान केलेल्या पारंपरिक वेशभूषेतील मराठमोळ्या महिलांनी रॅलीद्वारे स्त्री सन्मान व शक्तीचा जागर केला. 

डी. वाय. पाटील ट्रस्ट, प्रतिमा सतेज पाटील सोशल वेल्फेअर यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिनानिमित्त ‘वॉक फॉर प्रोग्रेस’ रॅलीचे आयोजन करण्यात आले. सकाळी दहाच्या सुमारास गांधी मैदानात मान्यवरांच्या हस्ते आकाशात फुगे सोडून रॅलीचे उद्घाटन झाले. स्वागत प्रतिमा सतेज पाटील यांनी केले. याप्रसंगी दै. ‘पुढारी’ कस्तुरी क्लबच्या अध्यक्षा डॉ. स्मितादेवी जाधव, आमदार सतेज पाटील, संयोगिताराजे छत्रपती, माजी खा. निवेदिता माने, महापौर स्वाती यवलुजे यांची प्रमुख उपस्थिती होती.

रॅलीत व्हाईट आर्मीच्या स्वसंरक्षण पथकाने महिलांना स्वसंरक्षणाचे उपाय फलकाद्वारे सांगितले. नेहरू हायस्कूल व ज्यु. कॉलेजच्या विद्यार्थिनींनी पोवाडा सादर करीत इतिहासातील कार्यकर्तृत्ववान महिलांची यशोगाथा सादर केली. 

अवनि व एकटी संस्थांच्या ग्रामीण भागातील महिला, प्रिन्स इंदुमतीदेवी गर्ल्स हायस्कूलच्या विद्यार्थिनी, सह्याद्री प्रतिष्ठानचे सदस्य, महिला सबलीकरण व सक्षमीकरणाचा संदेश देणार्‍या बुलेटस्वार बीना देशमुख, जयश्री पाटील, मोहिनी पैठणी ग्रुप, फुलेवाडीच्या स्वामिनी बहुउद्देशीय संस्थेच्या सदस्या, विवेकानंद महाविद्यालयाच्या वनस्पतिशास्त्र विभागातील विद्यार्थिनींनी  तसेच गार्डन क्लब ऑफ कोल्हापूरच्या सदस्यांनी जनजागृतीवर प्रबोधन केले.

रॅलीत शिल्पा नरके, समरीन मुश्रीफ, नबीरा मुश्रीफ, सई खराडे, माजी महापौर हसिना फरास, अश्‍विनी रामाणे, वंदना बुचडे, वैशाली डकरे, सरलताई पाटील, संध्या घोटणे, वनिता देठे, सुरेखा शहा, काँग्रेसच्या नगरसेविका, सामाजिक कार्यकर्त्या यांच्यासह शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थी रॅलीत सहभागी झाल्या
 होत्या.