Fri, Apr 26, 2019 15:52होमपेज › Kolhapur › चिकाटी आणि सातत्याच्या जोरावर यश मिळते  : प्राची भिवसे(व्हिडिओ) 

चिकाटी आणि सातत्याच्या जोरावर यश मिळते  : प्राची भिवसे(व्हिडिओ) 

Published On: Mar 06 2018 8:46PM | Last Updated: Mar 06 2018 8:46PMकोल्हापूर : पुढारी ऑनलाईन

स्त्रीच्या अस्तित्वाचा झेंडा आता प्रत्येक क्षेत्रात फडकत आहे. याचेच उदाहरण म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विक्रीकर निरीक्षक परीक्षेत राज्यात महिला प्रवर्गात प्रथम येण्याचा मान मिळालेल्‍या प्राची भिवसे. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने पुढारी ऑनलाईनने त्‍यांचा यशाचा आढावाल घेतला. 

कोल्हापुरातील एचएससी बोर्ड जवळील पद्मा कॉलनीत राहणार्‍या प्राची भिवसे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विक्रीकर निरीक्षक परीक्षेत प्रथम क्रमांक मिळविला. भिवसे यांनी वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरींग येथून इलेक्ट्रॉनिक्स विषयात बीटेक केले आहे. जानेवारी २०१५ पासून राज्यसेवा परीक्षा अभ्यासाला त्यांनी  सुरुवात केली. गेल्‍या वर्षी एका गुणाने विक्रीकर निरीक्षक परीक्षा अनुत्तीर्ण झाल्‍यानंतर प्राची यांनी पुन्हा जोमाने अभ्यास केला. त्यानंतर २०१७ मध्ये झालेल्या परीक्षेत अव्वल ठरत राज्यात पहिला क्रमांक पटकावण्याचा मान त्यांनी मिळविला आहे. 

"जिद्द, चिकाटी आणि सातत्याच्या जोरावर हमखास यश मिळवता येते. मला मिळालेल्या यशामध्ये आई-वडील, शिक्षक तसेच मित्र-मैत्रिणींचाही मोलाचा वाटा आहे. तसेच माझा प्रवास अजून संपला नाही तर, मला आता क्लास वनची पोस्ट मिळवायची आहे." अशी महत्‍वकांशा प्राची यांनी पुढारी ऑनलाईनशी बोलताना व्यक्‍त केली.