Thu, Jul 18, 2019 02:46होमपेज › Kolhapur › महिलांची छेड काढणार्‍या विकृत तरुणास बेदम चोप

महिलांची छेड काढणार्‍या विकृत तरुणास बेदम चोप

Published On: Jul 01 2018 1:52AM | Last Updated: Jul 01 2018 1:15AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

घराच्या अंगणात साफसफाई करणार्‍या महिलांची छेड काढणार्‍या एका विकृत तरुणास नागरिकांनी चोप देत पोलिसांच्या हवाली केले. दीड महिन्यापासून राजारामपुरी, मंगळवार पेठ परिसरात हा प्रकार सुरू होता. दीपक रामचंद्र यादव (वय 28, रा. खोतवाडी, पन्हाळा) असे संशयिताचे नाव आहे. राजवाडा पोलिसांत विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. 

मंगळवार पेठेतील संबंधित महिला शनिवारी सकाळी घरासमोर झाडलोट करीत होती. यावेळी संशयित दीपक यादव मोटारसायकलवरून त्याठिकाणी आला. ‘माझ्यासोबत चल’ असे म्हणून जबरदस्तीने हात ओढून मोटारसायकलवर बसविण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार पाहताच गल्लीतील नागरिक जमा झाले. त्यांनी संशयिताला चोप देत पोलिसांच्या हवाली केले. 

संशयित विकृत

दीड महिन्यापूर्वी राजारामपुरी परिसरात घराच्या सकाळच्या वेळीस रांगोळी काढणार्‍या महिलांची छेड काढण्याचा प्रकार झाला होता. मोटारसायकलची नंबरप्लेट कापडाने झाकून संशयित तरुण फिरत होता. महिलांच्या पाठीत टपली मारून जाण्याचा प्रकार त्याने काही वेळा केला. या परिसरातील तरुण त्याच्या मागावर होते. शनिवारी काही तरुण पाठलाग करीत आले असताना मंगळवार पेठेत तो सापडला. त्यांनी चोप देत त्याला पोलिसांच्या हवाली केले.