होमपेज › Kolhapur › जिल्हा पोलिस दलात आज ‘महिलाराज’

जिल्हा पोलिस दलात आज ‘महिलाराज’

Published On: Mar 08 2018 2:05AM | Last Updated: Mar 07 2018 11:16PMकोल्हापूर : प्रतिनिधी

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत उद्या (गुरुवारी) जिल्हा पोलिस दलात ‘महिलाराज’ अवतरणार आहे.जिल्ह्यातील सर्वच पोलिस ठाण्यांच्या प्रभारी अधिकार्‍यांसह ठाणे अंमलदार पदाची सूत्रे महिला पोलिस अधिकारी सांभाळणार आहेत. या निमित्ताने नव्या जबाबदारीची संधी मिळणार आहे.

जागतिक महिला दिनाचा योग साधून विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी कोल्हापूर परिक्षेत्रांतर्गत पाचही जिल्ह्यांतील पोलिस ठाण्यांतर्गत जबाबदारीची संधी महिला अधिकार्‍यासह सहायक फौजदार, हवालदार, पोलिस नाईक व महिला कॉन्स्टेबलना दिली आहे. गतवर्षापासून हा शिरस्ता पाळला जात आहे.

जिल्हा पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी जिल्ह्यातील सर्व महिला अधिकार्‍यांपासून कॉन्स्टेबलना प्रभारी अधिकारी पदाची संधी उपलब्ध करून दिली आहे. पोलिस ठाण्यांतर्गत सर्व कामकाज महिला अधिकारी सांभाळणार आहेत.

ठाणे अंमलदार म्हणून सेवा ज्येष्ठतेनुसार महिला हवालदारांना संधी मिळणार आहे. पोलिस मुख्यालयातही ‘महिलाराज’ अवतरणार आहे. येथील महत्त्वाच्या विभागांचा कार्यभारही महिलांवर सोपविण्यात येणार आहे, असेही पोलिस अधीक्षक मोहिते यांनी सांगितले.