होमपेज › Kolhapur › खुरप्याने वार करून भावजयीचा खून

खुरप्याने वार करून भावजयीचा खून

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

गडहिंग्लज : प्रतिनिधी

कौटुंबिक कारणावरून खुरप्याने मानेवर वार करून दिराने भावजयीचा खून केला. वडरगे (ता. गडहिंग्लज) येथे रविवारी दुपारी एकच्या सुमारास ही घटना घडली. मंगल मधुकर पोटे (वय 45) असे मृत महिलेचे नाव आहे. दीर श्रावण चन्नाप्पा पोटे (वय 34) याला गडहिंग्लज पोलिसांनी अटक केली आहे. संशयिताचे चुलते आप्पा निंगाप्पा पोटे यांनी फिर्याद दिली.

पोलिस व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी : महिनाभरापासून श्रावण हा कुटुंबीयांशी  शेत वाटणीच्या कारणावरून वाद घालत होता. व्यसनी असल्यामुळे घरात कोणाशीही त्याचे पटत नव्हते. मंगलमुळेच पत्नी माझ्याशी भांडते, असा श्रावणचा समज होता. रविवारी दुपारी आप्पा पोटे घराशेजारी असलेल्या गोठ्याकडे झोपण्यासाठी जात असताना, श्रावणने त्यांच्याशी वाद घातला. खुरपे घेऊन मारायला धावला. यावेळी आप्पा पोटे यांच्या सुना मंगल, सरिता व मीनाक्षी त्याला अडविण्यासाठी पुढे आल्या. रागाच्या भरात श्रावणने खुरप्याने मंगल यांच्या मानेवर जोरदार वार केला. यात त्या जागीच कोसळल्या. त्यांना उपचारासाठी नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.

नंतर श्रावण स्वतः पोलिस ठाण्यात हजर झाला. श्रावणचा एक भाऊ मधुकर सिक्युरिटी गार्ड व दुसरा भाऊ सदाशिव गुजरातमध्ये आहे. मंगल यांच्या मागे पती, मुलगा,  मुलगी असा परिवार आहे. पोलिस निरीक्षक विपिन हसबनीस यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.
 


  •