Wed, May 22, 2019 14:37होमपेज › Kolhapur › विवाहितेचा विहिरीत बुडून मृत्यू

विवाहितेचा विहिरीत बुडून मृत्यू

Published On: Jan 12 2018 1:52AM | Last Updated: Jan 12 2018 1:28AM

बुकमार्क करा
आजरा :प्रतिनिधी

पाणी आणण्यासाठी विहिरीवर गेलेल्या सौ. पूजा मनोहर चौगुले (वय 28, रा. गोठण गल्ली, आजरा) यांचा पाय घसरून विहिरीत पडल्याने बुडून मृत्यू झाला. गुरुवारी दुपारी बाराच्या सुमारास ही घटना घडली. याची वर्दी सासरे मारुती चौगुले यांनी आजरा पोलिसांत दिली. 

दरम्यान, पूजाचे वडील सुरेश शामराव पाटील (रा. वेसर्डेपैकी देऊळवाडी, ता. भुदरगड) यांनी मृत्यूबाबत संशय व्यक्‍त करत पोलिसांत फिर्याद दिल्याने  पती मनोहर मारुती चौगुले व सासू सुजाता मारुती चौगुले यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

पूजाच्या मृत्यूची माहिती वेसर्डेपैकी देऊळवाडी (ता. भुदरगड) येथील माहेरच्या मंडळींना कळताच ते मोठ्या संख्येने आजरा ग्रामीण रुग्णालय व आजरा पोलिस ठाण्यात आले. पूजाला माहेरून 25 हजार रुपये आणण्याचा तगादा सासरे मारुती चौगुले, पती मनोहर चौगुले व सासू सौ. चौगुले यांनी लावला होता. त्यासाठी ती शुक्रवारी (दि. 12)  माहेरी येणार होती, असेही पाटील यांनी सांगितले. नातेवाईक ग्रामीण रुग्णालयात आल्याने काही काळ वातावरण तणावपूर्ण बनले होते. पोलिसांनी नातेवाईकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर ते पोलिस  ठाण्यात आले. पूजाचे वडील सुरेश पाटील यांनी पती व सासूविरोधात फिर्याद दिल्याने गुन्हा नोंद करण्यात आला. पूजाचा 2013 साली विवाह झाला होता. त्यानंतर वेळोवेळी सासरच्या मंडळींनी तिचा मानसिक व शारीरिक छळ केल्याची तक्रार आपल्याकडे केली होती, असे वडील सुरेश पाटील यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. रात्री उशिरा पूजा हिच्या मृतदेहावर आजरा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. पूजा हिला चार वर्षांचा मुलगा आहे. पुढील तपास सहायक फौजदार नजीर पटेल करीत आहेत.