Mon, Aug 19, 2019 13:20होमपेज › Kolhapur › रेबीजने महिलेचा मृत्यू जयसिंगपुरातील घटना

रेबीजने महिलेचा मृत्यू जयसिंगपुरातील घटना

Published On: Jul 14 2018 12:21AM | Last Updated: Jul 14 2018 12:21AMजयसिंगपूर : प्रतिनिधी

रेबीजची लागण होऊन शुक्रवारी एका महिलेचा मृत्यू झाला. रेबीजने आजअखेर शहरात तिघांचा मृत्यू झाला. राजीव गांधीनगर गल्ली नं. 9 मध्ये राहणार्‍या महिलेचे नाव कोंडाबाई बाबासाहेब बारूदवाले (वय 65) असे आहे. त्यांना सहा महिन्यांपूर्वी कुत्रे चावले होते. यामुळे शहरातील भटक्या कुत्र्यांचा प्रश्‍न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

तीन महिन्यांपूर्वी राजीव गांधीनगरातील उमर सय्यद (वय 28), 23 जूनला संकेत अभयकुमार नांदणे-सरडे (23, रा. जयप्रकाश सोसायटी, मूळ रा. कोथळी) या इंजिनिअर असलेल्या एकुलत्या तरुणाचा मृत्यू रेबीजने झाला होता.

बुधवारी रात्री कोंडाबाई यांना उलटी होऊन ताप आला होता. गुरुवारी सकाळी त्यांना येथील संजीवनी रुग्णालयात नेण्यात आले. त्यावेळी रेबीजची लक्षणे आढळून आल्याने त्यांना सांगली सिव्हिल शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. शुक्रवारी दुपारी एक वाजता त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्‍चात मुलगा, सून, नातवंडे, बहीण असा परिवार आहे.

जयसिंगपूर शहरात राजीव गांधी नगर व विशेषतः गल्ली नं. 9 या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भटकी कुत्री व पाळीव कुत्री आहेत. पाळीव कुत्री घरामध्ये बंदिस्त न ठेवता ती मोकळीच असतात. पालिकेकडून कुत्री पकडताना त्यांचे मालक त्याला विरोध करतात. अशा मोकळ्या सोडलेल्या कुत्र्यांचा सर्वसामान्य नागरिकांना त्रास होऊन मृत्यूला सामोरे जावे लागत आहे. या कुत्र्यांचा पालिकेने बंदोबस्त करावा, विरोध करणार्‍या मालकांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

कोंडाबाई बारूदवाले यांना सहा महिन्यांपूर्वी घराजवळ भटक्या कुत्र्याने चावा घेतला. त्या तत्काळ प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रतिबंधक लस घेण्यासाठी गेल्या. मात्र, दवाखान्याच्या दारातूनच लस न घेता घरी परतल्या. त्यांनी गावठी उपचार केला होता.