Fri, May 24, 2019 02:47होमपेज › Kolhapur › #Women’sDayमहिला चालक का नको?

#Women’sDayमहिला चालक का नको?

Published On: Mar 08 2018 2:05AM | Last Updated: Mar 08 2018 2:05AMरिक्षा-टॅक्सी चालवण्यापासून ते कॉर्पोरेट कंपनीमधील बॉसची भूमिका बजावणारी... विविध क्षेत्रांतील संपूर्ण कारभाराचा डोलारा सांभाळणारी ‘ती’ आजच्या काळात सक्षम झाली आहे. घराची सगळी व्यवस्था बघून बाहेरची कामेही सांभाळणार्‍या स्त्रियांच्या कार्यक्षमतेवर समाजात आजही बरेच गैरसमज आहेत. त्यापैकी एक गैरसमज म्हणजे, महिलांना व्यवस्थित गाडी चालवता येत नाही. महिलांच्या गाडी चालवण्याबाबत अजूनही मानसिकता बदलली नसून, अद्याप महिलांच्या या पेशावर अजूनही निर्बंध लादले जात आहेत. एकीकडे, पुरुष वाहनचालकांची मागणी केली जात असताना, शासकीय अथवा खासगी क्षेत्रात महिलांना वाहनचालक म्हणून संधी दिली जात नाही अथवा नाकारले जात आहे. महिलांना गाडी चालवता येत नाही किंवा पुरेशा प्रशिक्षित महिला चालक उपलब्ध होत नाहीत, अशा चुकीच्या गोष्टींचं समर्थन करण्यापेक्षा आपणच पुढाकार घेऊन यावर काहीतरी तोडगा काढला पाहिजे, असे महिलांना वाटायला हवे. उच्चपदस्थ महिलांनी त्यांच्या गाडीवर पुरुष वाहनचालक नेमण्याऐवजी महिलांना प्राधान्यक्रम द्यायला हवा. महिला वाहनचालक सुशिक्षित असल्यास ती स्वीय सहायकाची जबाबदारीही योग्यरीतीने पार पाडू शकते, अशी अनेक मतमतांतरे...

मंत्र्यांपासून पोलिस आयुक्त अथवा अभिनेत्रीपर्यंत कोणाही महिलेच्या कारचे सुकाणू म्हणून ‘ड्रायव्हिंग व्हील’ मात्र पुरुषांच्याच हाती असल्याचे अद्यापही दिसते. असे का? या प्रश्‍नाचा शोध घेण्यासाठी दै. ‘पुढारी’ ने अनेक महिलांच्या मतांचा मागोवा घेतला. त्यापैकी ही काही प्रातिनिधिक मते...

(संकलन : भाग्यश्री जाधव, शीतल खांगटे, अपर्णा बडे)

आजचा काळ बदलला आहे. स्त्री शिक्षण घेऊ लागलीय. स्वत:ची ओळख निर्माण करू लागलीय. असं सगळं असलं, तरी स्त्रियांना भेडसावणारा प्रश्‍न म्हणजे स्वतःची सुरक्षितता. आजकाल महिलांनाही कामानिमित्त रात्री-अपरात्री बाहेर पडावे लागते अशावेळी पुरुष चालकापेक्षा महिला चालक असल्यास जास्त सुरक्षित वाटू शकते, तसेच महिलांमध्ये उपजतच बहुआयामी गुण असतात, त्यामुळे या महिला स्वीय सहायक म्हणूनदेखील काम करू शकतात. मागील 25 वर्षांपासून मी स्वतःच्या गाडीवर महिला चालकच्या शोधात आहे. मात्र, अजूनपर्यंत एकही महिला वाहनचालक मिळाली नाही. या क्षेत्रातही महिलांना चांगला वाव आहे, गरज आहे ती आत्मविश्‍वासाची. महिलांनी या क्षेत्रातही एक स्थान निर्माण केले पाहिजे. प्रत्येक मुलगी सुशिक्षित आणि संरक्षित असली पाहिजे. त्यांना विकासाच्या आणि रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या पाहिजेत, असे वाटणार्‍या प्रत्येक महिलेने याबाबत विचार करायला हवा. उच्चपदस्थ महिलांनी गाडी चालविण्यासाठी पुरुष वाहनचालकाऐवजी महिला वाहनचालक हवी, यासाठी पुढाकार घ्यायला हवा, असे मला वाटते. 

- डॉ. नलिनी पाटील, प्राचार्या, शिक्षणशास्त्र विभाग, एसएनडीटी महिला विद्यापीठ 

मी माझ्या मतदारसंघामध्ये महिलांना मोफत चारचाकी वाहनांचे ड्रायव्हिंगचे प्रशिक्षण दिले आहे. यामुळे अनेक महिलांनी त्यांचे स्वतःचे व्यावसाय सुरू केले आहेत. या प्रशिक्षणामुळे अनेक महिला रिक्षा, स्कूलबस, तसेच भाजीचा टेम्पो चालवितात. मात्र, शासनस्तरावर प्रशासकीय अधिकार्‍यांच्या वाहनांवर चालक भरती होते, यामध्ये महिलांसाठी राखीव कोटा नसतो. या क्षेत्रामध्ये महिला कमी असल्याचे जाणवते. याबाबत मी शासनाचे लक्ष वेधून अंमलात आणण्याचा प्रयत्न करेन. वाहनचालकांच्या क्षेत्रातही महिलांचा वावर वाढविण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन. आपल्याला अनेक क्षेत्रांत महिलांचा वावर पाहायला मिळतो. मात्र, या क्षेत्रात महिलांचा वावर कमी आहे. यासाठी जनजागृतीची गरज आहे. वाहनचालक क्षेत्रातही महिला तेवढ्याच सक्षमपणे काम करू शकतात. फक्त त्यांना गरज असते ती प्रोत्साहनाची. महिलांसाठी शासनही अनेक उपक्रम राबवत आहे. यातून महिला स्वतःचे व्यवसाय सुरू करून घरही सांभाळतात. ही बाब कौतुकास्पद आहे. प्रशासकीय महिलांच्या वाहनांवर महिला चालक असावी, यासाठी मी स्वतः विधिमंडळ सभागृहात प्रश्‍न उपस्थित करून त्याचा पाठपुरावा करेन. 

    - मेधा कुलकर्णी, आमदार 

पोलिस दलात महिला कर्मचार्‍यांची संख्या वाढावी, यासाठी मी विशेष पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्यानंतरही पोलिस दलातील महिलांचे प्रमाण नगण्य असल्याचे आढळून आल्याने मी पुन्हा गृह खात्याच्या सचिवांशी चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेतला. उंची कमी असल्याने महिलांना भरतीतून नाकारले जात असल्याचे निदर्शनास येताच उंचीची अट शिथिल करण्यासाठी मी प्रयत्न केले अन् त्या प्रयत्नांना यशही आले. आता मुद्दा येतो तो प्रशासकीय क्षेत्रातील महिला चालक भरतीचा. परंतु, समाजव्यवस्थेतील रचनेमुळे तसेच, महिलांना कुटुंबातील जबाबदार्‍या पार पाडाव्या लागत असल्याने त्या स्वतःही या व्यवसायाकडे फारशा वळताना दिसत नाहीत. योग्य त्या सुरक्षाव्यवस्थेचा अभाव यामुळेही कदाचित महिला चालकांचे प्रमाण कमी दिसून येते. जसजशी समाजव्यवस्था बदलेल, तसतसे या क्षेत्रातील महिलांचे प्रमाणही निश्‍चितच वाढेल. आज महिला कलेक्टर आहे, महिला पायलट आहेत, एवढेच काय, तर रेल्वे आणि एस.टी. चालक म्हणूनही महिलांची भरती होत आहे. त्यामुळे महिला चालक नाहीत, असे म्हणणेही योग्य ठरणार नाही. महिलांनी स्वेच्छेने या क्षेत्रात पदार्पण केले, तर या क्षेत्रातही तिचा टक्का वाढल्याशिवाय राहणार नाही.      

                                                                                                                  - नीलम गोर्‍हे, आमदार