Thu, Apr 25, 2019 15:29होमपेज › Kolhapur › करिअरची निवडली वेगळी वाट

#Women’sDayकरिअरची निवडली वेगळी वाट

Published On: Mar 08 2018 2:05AM | Last Updated: Mar 08 2018 2:05AMहे काम पुरुषांचे आहे, ते त्यांनीच करावे... असा म्हणणारा समाज महिलांनी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करावे, असेही अनेकदा म्हणतो. मात्र, प्रत्यक्षात ते करताना महिलांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. ती डॉक्टर, ती इंजिनिअर असे कोणाकडून ऐकले, तर काही वावगे वाटत नाही. मात्र, ती कंडक्टर, ती मेकॅनिक असे म्हटले, तर काहीसे चुकल्यासारखे वाटते; पण शहरातील अनेक महिला या क्षेत्रात कार्यरत असून, त्या आपले काम अतिशय चांगल्याप्रकारे करत आहेत. त्यांच्यातीलच काही भगिनींचे कामासंदर्भातील गोड-कटू अनुभव त्यांनी दै. ‘पुढारी’शी बोलताना व्यक्त केले.

- भाग्यश्री जगताप, औरंगाबाद  

संकटांना सामोरे जात नोकरी : शिवकन्या तिडके 

मूळच्या बीड जिल्ह्यातील धारूरच्या शिवकन्या तिडके या एस.टी. महामंडळात 2009 पासून कंडक्टर म्हणून कार्यरत आहेत. नोकरीनिमित्त त्या औरंगाबाद शहरात आल्या. गेल्या नऊ वर्षांपासून त्या अनेक संकटांना सामोरे जात आपले काम हीच जनसेवा मानत कार्यरत आहेत. शिवकन्या म्हणतात की, एक महिला कंडक्टर म्हणून लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन कौतुकास्पद आहे. मी एकेदिवशी सकाळी 6.15 वा.च्या दरम्यान बसस्टँडला येत असताना, चार-पाच टवाळखोरांनी माझा रस्ता रोखला व माझ्यासोबत छेडछाड करू लागले. माझ्या बॅगमध्ये एस.टी. तिकिटाचे जमा असलेले 28 हजार रुपये त्यांनी हिसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र, या परिस्थितीतून सोडवायला कोणीही आले नाही. उलट बघ्याची भूमिका लोकांनी घेतली. मी कशीतरी माझी सुटका करत केबिन गाठून ते पैसे वाचवले. यावरून एक लक्षात आले की, आपले रक्षण आपणच करायचे आहेे, महिलांनी स्वावलंबी व्हावे, तसेच कुठलाही प्रसंग आला, तर त्याला जिद्दीने सामोरे जावे.

रुजू करून घेण्यास केला होता विरोध : शोभा खापर्डे 
एम.ए. झालेल्या शोभा खापर्डे यांनी केवळ एक आवड म्हणून 2005 साली कंडक्टर हा पेशा निवडला. शोभा यांना नेवासा या ठिकाणी रुजू होण्याचे आदेश आले. मात्र, पत्र असूनही व्यवस्थापक त्यांना नोकरीवर रुजू करून घेण्यास तयार नव्हते. कारण काय, तर आमच्याकडे आजपर्यंत एकही महिला काम करत नाही. त्यामुळे तुम्हाला कामावर घेता येणार नाही. मात्र, त्यांनी नोकरी मिळावी म्हणून वरिष्ठांकडे मागणी केली व अखेर त्या रुजू झाल्या. शोभा खापर्डे सांगतात की, ही नोकरी करताना मुख्य गोष्ट म्हणजे, इतर महिलांशी ओळखी होतात. त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांचे मन हलके होते अन् आपसूकच त्यांच्यासोबत मैत्रीचे संबंध तयार होतात. एकदा शिर्डी-औरंगाबाद गाडी सकाळी 6 वा. निघाली; पण गाडीतील एक प्रवासी अचानक वारल्याने सायंकाळचे 7 औरंगाबादला पोहोचण्यास लागले. यासारखे अनुभव येतात; पण कोणत्याही प्रसंगाला घाबरून न जाता खंबीरपणे उभे राहण्याची ताकद या नोकरीतून मिळाली आहे. 

या कामाची आता भीती नाही वाटत : सरोज पाटील
एस.टी.चा प्रवास सुरक्षित प्रवास असे म्हटले जाते, यामागे सर्वात मोठी भूमिका असते ती मेकॅनिकची. अशाच सरोज पाटील या एस.टी.चा प्रवास हा सुखकर व्हावा म्हणून गेल्या 11 वर्षांपासून एस.टी.च्या मध्यवर्ती कार्यशाळेत कार्यरत आहेत. त्यांनी आयटीआयचे (इलेक्ट्रिशियन) शिक्षण घेतले. सध्या त्या सहायक मेकॅनिक म्हणून काम पाहत आहेत. एस.टी.ची विशिष्ट कामे न करता त्यांनी सर्व कामांचा अनुभव घेतला. त्यांना सुरुवातीला त्या कामांची भीती वाटली; पण त्यांना सगळीच कामे हळूहळू जमायला लागली. आता त्या सर्व कामे चांगल्याप्रकारे करतात. सरोज सांगतात की, सुरुवातीला पुरुषांसोबत काम करताना भीती वाटायची. मात्र, त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. आता त्यांच्यासोबत काम करताना कसलीही भीती वाटत नाही.

मेकॅनिक होण्यात काय वावगे : सुजाता मशीद्वार 
एस.टी.च्या कार्यशाळेत मेकॅनिक म्हणून कार्यरत असणारी सुजाता हिने जिद्दीने नोकरी मिळवली. आयटीआयचे शिक्षण पूर्ण केले. इतर मुलींसारखे आपल्या मुलीनेही ऑफिसमध्ये किंवा शाळेवर नोकरी करावी, असे सुजाताच्या घरच्यांना वाटत होते. मात्र, तिची मेकॅनिक या क्षेत्रात असणारी आवड, तसेच कोणतीही नोकरी असो काम करावेच लागते, मग मेकॅनिक होण्यात काय वावगे, असे नेहमी म्हणणार्‍या सुजाताने आपली वाट निवडली. सुजाता सांगते, आजच्या जगात लोक काय म्हणतील हा विचार न करता, आपली स्वप्ने महिलांनी पूर्ण करावीत. शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभे राहून पुरुषांच्या खांद्याला खांदा देत काम करावे, तरच नारीशक्ती टिकून राहील.