Sat, Apr 20, 2019 10:08होमपेज › Kolhapur › ‘कळंब्या’त दीड वर्षात 15 कैद्यांचा मृत्यू

‘कळंब्या’त दीड वर्षात 15 कैद्यांचा मृत्यू

Published On: Aug 12 2018 1:01AM | Last Updated: Aug 12 2018 1:01AMकोल्हापूर : दिलीप भिसे

सताराशेवर कैद्यांची क्षमता असताना प्रत्यक्षात सव्वादोन हजारांवर बंदिवान, वैद्यकीय सेवेची जुजबी यंत्रणा आणि कारावास भोगताना कैद्यांतील नैराश्य, चिंता अन् तणावामुळे कळंबा कारागृहाचे आरोग्य बिघडल्याचे चित्र दिसून येते. खुनासह अन्य गंभीर गुन्ह्यांत कारावास भोगणार्‍या पंधरावर कैद्यांचा दीड वर्षात मृत्यू झालेला आहे. कळंबा कारागृहात नुकत्याच झालेल्या महाआरोग्य शिबिरात शारीरिक तपासणी झालेल्या 1 हजार 32 पैकी 177 कैद्यांना गंभीर आजार जडल्याचे निदर्शनास आले आहे. रक्तदाब, मधुमेह, क्षयरोगासह 23 कैदी असाध्य रोगाने त्रस्त झाले आहेत. 

पाचगाव (ता. करवीर) येथील राजकीय सूडचक्रातून झालेल्या धनाजी गाडगीळ खुनात आजन्म कारावास भोगणार्‍या अक्षय कोंडेकर या कैद्याचा सीपीआरमध्ये उपचार सुरू असताना मृत्यू झाला. कोंडेकरला हृदयविकाराचा त्रास असतानाही प्रशासनाची दिरंगाई व उपचारातील हलगर्जीपणाचा आरोप करत संतप्त नातेवाइकांनी शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांना केलेल्या धक्काबुक्कीमुळे कारागृहातील वैद्यकीय आरोग्याचा विषय कळीचा मुद्दा बनला आहे.
कारागृह म्हणजे चार भिंतींआडचं विश्‍वच जणू... क्षणिक राग, लोभातून झालेल्या कृत्यावर पश्‍चात्ताप भोगण्याची कोठडीच. कैदी म्हणूनच इथलं जगणं... त्यावरही कोठडीतल्या रखवालदारांचीच हुकूमत... कायद्याच्या चौकटीत राहून मिळणार्‍या साधनसुविधा... त्यात आरोग्य सुविधा हा कळीचा मुद्दा... नेमके याच सुविधेकडे कारागृह प्रशासन, किंबहुना शासन यंत्रणेचा ढिसाळपणा... राज्यातील अनेक कारागृहांत आरोग्य सुविधांची वानवा असतानाही याकडे फारसे गांभीर्याने पाहिले जात नाही. त्यामुळेच गंभीर गुन्ह्यांत कारावास भोगणार्‍या कैद्यांना योग्य उपचारांअभावी मृत्यूला कवटाळावे लागते.

कोल्हापूर येतील कळंबा कारागृह, मुंबई, पुणे, तळोजा, नागपूरसह राज्यातील अन्य कारागृहांत यापेक्षा फार वेगळी स्थिती आहे, असे नाही. सव्वाशे एकर क्षेत्र असलेल्या कळंबा कारागृहाची अवघ्या 30 एकर क्षेत्रात उभारणी करण्यात आली आहे. गुन्हे शाबीत होऊन कारावास भोगणार्‍या सतराशेवर कैद्यांची क्षमता असताना कोंबड्यांच्या खुराड्याप्रमाणे दोन-सव्वादोन हजारांवर कैद्यांना कारागृहातील बॅरेकमध्ये ठेवण्यात आले आहे.

 अपुर्‍या सुविधा, मानसिक स्थितीआणि शारीरिक व्याधी!

कारागृहांतर्गत बॅरेकमधील अपुरी जागा, आरोग्याच्या उद्भवणार्‍या समस्या, कारावास भोगताना झालेल्या कृत्यावर पश्‍चात्ताप, कौटुंबिक समस्यांचा कालांतराने कैद्यांच्या दैनंदिनीवर परिणाम जाणतो. त्यात चिंता, तणाव यासारख्या मानसिक समस्यांची भर पडते. या सार्‍या चक्रातून मग शारीरिक व्याधी उफाळून येतात आणि तरणाबांड गडीही मानसिक धक्क्याने मृत्यूला कवटाळतो.

कारावास भोगणार्‍या कैद्यांची वर्षातून किमान दोन, तीन वेळा वैद्यकीय तपासणी होऊन त्यांच्यावर उपचार व्हावेत, असे  सर्वोच्च न्यायालयाचे देशातील सर्वच कारागृह प्रशासनाला निर्देश आहेत. त्यानुसार जिल्हा विधिसेवा प्राधिकरणाच्या पुढाकाराने पंधरवड्यापूर्वी कळंबा कारागृहात महाआरोग्य वैद्यकीय तपासणी शिबिर घेण्यात आले. त्यात 1 हजार 32 कैद्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तपासणीत 177  कैदी आजाराने त्रस्त झाल्याचा अहवाल उपलब्ध झाला आहे.

दीड वर्षात 15 आजारग्रस्त कैद्यांनी मृत्यूला कवटाळले

विस्तिर्ण अशा कळंबा कारागृहातील कैद्यांची क्षमतेपेक्षा अधिक संख्या लक्षात घेता सद्यस्थितीत असलेली आरोग्याची यंत्रणा अत्यंत कुचकामी ठरत आहे. डॉक्टरांची दोन पदे मंजूर असताना तीन वर्षापासून अवघ्या एका वैद्यकीय अधिकार्‍यावर जबाबदारी निभावली जात आहे.साथीला एक मदतनीस... औषधे शोधूनही मिळत नाहीत... जानेवारी-डिसेंबर 2018 या काळात 8 तर जानेवारी ते 10 ऑगष्ट 2018 या काळात 7...दीड वर्षात 15 कैद्यांचा मृत्यू झाल्याचे आकडे बोलतात.

वैद्यकीय तपासणीचा धक्कादायक अहवाल!

रक्तदाबाचे 70, मधुमेह 57, क्षयरोग 7, असाध्य रोग 23, कॅन्सर 1, महिलांत रक्तदाब 7, मधुमेह 5 असे रुग्ण तपासणीत आढळून आले आहेत. तपासणीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर कळंबा कारागृह प्रशासनामार्फत वैद्यकीय सुविधांसाठी पाठपुरावा सुरू केला असला, तरी शासन यंत्रणा अद्याप ढिम्म असल्याचे दिसून येते. कारागृहात शिक्षा भोगणार्‍या अक्षय कोंडेकरसह दोन कैद्यांचा एकाच दिवशी मृत्यू व्हावा, हे कशाचे द्योतक म्हणायचे?