Mon, Apr 22, 2019 23:43होमपेज › Kolhapur › सीपीआरमध्ये लवकरच प्रसूती विभागांतर्गत ‘आयसीयू’

सीपीआरमध्ये लवकरच प्रसूती विभागांतर्गत ‘आयसीयू’

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कोल्हापूर : विशेष प्रतिनिधी

स्त्रियांच्या प्रसूतीदरम्यानच्या गुंतागुंतीतून होणार्‍या माता मृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी कोल्हापुरात सीपीआर रुग्णालयात प्रसूतिशास्त्र विभागांतर्गत एक सुसज्ज अतिदक्षता विभाग उभारण्यात येतो आहे. त्यासाठी आवश्यक निधी संबंधित खात्यात वर्ग झाल्यामुळे येत्या दोन महिन्यांत हा विभाग पूर्णक्षमतेने कार्यरत होईल, अशी माहिती राजर्षी शाहू वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद व वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिशिर मिरगुंडे यांनी दै. ‘पुढारी’शी बोलताना दिली.

देशामध्ये महिलांच्या प्रसूतीतील अडथळे दूर करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांद्वारे उपक्रम राबविण्यात येत आहेत. गर्भवती मातांना पोषण आहार, वेळोवेळी आरोग्याची तपासणी आणि राष्ट्रीय कुटुंबकल्याण कार्यक्रमांतर्गत मोफत औषधोपचार या उपक्रमांचा लाभ होतो आहे. तथापि, प्रसूतीदरम्यान होणारी गुंतागुंत आणि त्यातून होणार्‍या माता मृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी प्रभावी व्यवस्था उपलब्ध नव्हती. अशा गुंतागुंतीच्या वेळी मातेवर उपचार करण्यासाठी स्वतंत्र अतिदक्षता विभागाची गरज असते. ही व्यवस्था आता सीपीआर रुग्णालयात उभारणीच्या टप्प्यात आहे. यातून 6 खाटांचा सुसज्ज अतिदक्षता विभाग निर्माण होत असून, दक्षिण महाराष्ट्रात शासकीय रुग्णालयात अशाप्रकारचा उभारण्यात येणारा हा पहिलाच प्रकल्प आहे. प्रसूतीदरम्यान होणारे माता मृत्यू ही जागतिक समस्या आहे. जगामध्ये आजमितीला प्रत्येक दिवशी 830 महिलांचा प्रसूतीच्या गुंतागुंतीतून मृत्यू होतो. यामुळे हे प्रमाण कमी करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या वतीने सर्वच राष्ट्रांना या धोक्याची जाणीव करून देण्यात आली होती. हे प्रमाण कमी करण्यासाठी उद्दिष्टही निश्‍चित करून देण्यात आले. यानुसार भारतात गेल्या काही वर्षांत मोठी प्रगती झाली असली, तरी आजही प्रत्येक तासाला भारतात प्रसूतीदरम्यान 5 महिलांचा मृत्यू होतो. याचे गांभीर्य लक्षात घेऊन शासनातर्फे राजर्षी शाहू छत्रपती शासकीय महाविद्यालयाला अशाप्रकारचा अतिदक्षता विभाग सुरू करण्याविषयी विचारणा करण्यात आली होती. त्यासाठी रुग्णालयात स्वतंत्र जागा उपलब्ध करून देण्याचे सांगण्यात आले. यानुसार जागा उपलब्धतेचा अहवाल कळवल्यानंतर मनुष्यबळ व उपकरणांची उपलब्धता करून देण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले. यापुढचा टप्पा म्हणून बांधकामाकरिता 70 लाख रुपयांचा निधी संबंधित खात्यावर वर्ग करण्यात आला असल्याने कोल्हापूरच्या नियोजित मेडिकल हबमध्ये ही एक नवी सुविधा दाखल होणार आहे.

Tags : CPR, ICU, delivery


  •