Thu, Apr 25, 2019 03:27होमपेज › Kolhapur › कोल्‍हापूर : भूमाता ब्रिगेडच्या पदाधिकारी माधुरी शिंदे यांची पतीकडून हत्या

कोल्‍हापूर : भूमाता ब्रिगेडच्या पदाधिकारी माधुरी शिंदे यांची पतीकडून हत्या

Published On: Jun 23 2018 4:27PM | Last Updated: Jun 23 2018 9:07PMजयसिंगपूर : प्रतिनिधी

पती-पत्नीत गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेला घटस्फोटाचा वाद आणि अनैतिक संबंधाच्या संशयातून उदगाव (ता. शिरोळ) येथे पतीने पत्नीचा कुर्‍हाडीने घाव घालून मुलासमोर खून केला. सौ. माधुरी सूर्यकांत शिंदे (वय 39) असे महिलेचे नाव आहे. पत्नीचा खून केल्यानंतर सूर्यकांत शिंदे हा स्वत: जयसिंगपूर पोलिसांत हजर झाला. घटनास्थळावर हजर असलेला संतोष श्रीकृष्ण माने-घालवाडे या तरुणालाही  पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

मुलगी कु. रेवा सूर्यकांत शिंदे (वय 17) हिने फिर्याद दिली आहे. सौ. माधुरी या भूमाता ब्रिगेडच्या जिल्हा उपाध्यक्षा होत्या. या घटनेने गावात खळबळ उडाली. माधुरीच्या आईने व बहिणीने घटनास्थळी आक्रोश केला. पोलिसांनी पंचनामा करून गुन्ह्यात वापरलेली कुर्‍हाड ताब्यात घेतली. सकाळी  साडेअकरा ते दुपारी साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली.

वडिलांनी कुर्‍हाडीने आईला मारल्याची आणि यावेळी संतोष माने घरात होता असा जबाब  मुलगा शिवराज (वय 8) याने दिल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी पत्रकार बैठकीत दिली.आरोपी सूर्यकांत याने पत्नीला व मानेला विचित्र अवस्थेत पाहिल्याने त्या मानसिकतेतून खून केल्याची कबुली दिल्याची माहितीही पिंगळे यांनी यावेळी दिली.

वाचा : माधुरी शिंदे खून प्रकरण : प्रमोद पाटील, संतोष मानेला अटक

उदगाव येथील जुना वैरण अड्डा चौकात कृष्णामाई सेवा संस्थेलगत शिंदे यांचे घर आहे. सौ. माधुरी या मुलगी रेवतीव मुलगा शिवराज (वय 8) यांच्यासह दोन खोलीवजा घरात तर लगतच सूर्यकांत, आई, वडील असे वेगळे राहत होते. पाच-सहा वर्षांपासून दोघात कौटुंबिक वाद सुरू असून, तो न्यायप्रविष्ट आहे. या वादातून दीड-दोन वर्षांपूर्वी सूर्यकांतने सौ. माधुरी यांच्या डोक्यात लोखंडी पहार घातली होती. तो गुन्हा पोलिसांत नोंद आहे.

शनिवारी सकाळी संतोष माने व सौ. माधुरी हे घरात होते.अनैतिक संबंध आणि विचित्र अवस्थेत पाहिले. मी दारावर टकटक केली. माझ्यात व माने याच्यात वाद झाला. पती-पत्नीत घटस्फोटाचा वाद असला तरी आम्ही अजून पती-पत्नी आहोत. मानेला मी वारंवार सांगितले होते, मात्र त्याने ऐकले नाही. या मानसिकतेतून मी पत्नीचा खून केला, असा जबाब सूर्यकांतने दिल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक पिंगळे यांनी दिली.

कुर्‍हाडीचा वर्मी घाव बसल्याने सौ. माधुरी यांचा जागेवरच मृत्यू झाला. दोन खोल्यांच्या मागे असलेल्या मोकळ्या जागेत त्या कोसळल्या होत्या. त्या ठिकाणीच कुर्‍हाड पडली होती. डाव्या मानेवर, कानाजवळ, पाठ व हातावर पाच ते सहा वार झाले आहेत.

उपनिरीक्षक किरण दिडवाघ, सहायक पोलिस निरीक्षक शहाजी निकम व  शिरोळचे समीर गायकवाड, पोलिस उपनिरीक्षक सुरेश नलवडे आदी घटनास्थळी दाखल होते. ठसेतज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. पंचनामा झाल्यानंतर दुपारी सव्वातीन वाजता  मृतदेह शवविच्छेदनासाठी हलविण्यात आला. कु. रेवाने फिर्यादीत, वेगळे राहत असल्यापासून चारित्र्याचा संशय वडील घेत होते.त्यातून आईचा धारधार कुर्‍हाडीने वार करून ठार मारल्याचे म्हटले आहे.

आंदोलनात सक्रिय...!

सौ. माधुरी या भूमाता ब्रिगेडच्या कोल्हापूर जिल्हा पदाधिकारी होत्या. शनि शिंगणापूर, अंबाबाई मंदिर व हाजीअली दर्ग्यात महिलांना प्रवेश मिळावा यासाठी झालेल्या आंदोलनात  तृप्ती देसाई यांच्याबरोबर सौ. माधुरी शिंदे या सक्रिय होत्या.