Sat, Aug 17, 2019 16:13होमपेज › Kolhapur › व्हॉटस् अ‍ॅप मॅसेजवरून मित्रांमध्ये हाणामारी

व्हॉटस् अ‍ॅप मॅसेजवरून मित्रांमध्ये हाणामारी

Published On: Feb 19 2018 1:22AM | Last Updated: Feb 19 2018 12:43AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

व्हॉटस्अ‍ॅपवरून एकमेकांविषयी टाकलेल्या मॅसेजवरून दोन मित्रांत हाणामारीचा प्रकार रविवारी सायंकाळी खासबाग परिसरात घडला. याबाबत विनायक शिवाजीराव चौगले (वय 38, रा. म्हाडा कॉलनी, संभाजीनगर) व विजय विठ्ठल जाधव (रा. उद्यमनगर) यांनी राजवाडा पोलिसांत परस्परविरोधी तक्रारी दाखल केल्या. खासबाग परिसरात खाद्यपदार्थ विक्री करणारे विनायक व विजय हे एकमेकांचे चांगले मित्र आहेत.

दोघांमध्ये व्हॉटस् अ‍ॅपवरून एकमेकांला टाकलेल्या मॅसेजवरून दोन दिवस वाद सुरू होता. रविवारी सायंकाळी दोघांतील वाद विकोपाला गेला. खासबाग परिसरातील खाऊगल्‍लीत दोघे हमरीतुमरीवर उतरले. अचानक घडलेल्या या प्रकाराने खाऊगल्‍लीत आलेले अनेकजण गोंधळले. यातच दोघांनी खाद्यपदार्थाच्या गाड्यावरील साहित्य रस्त्यावर फेकण्यास सुरुवात केली. यावेळी अडवणूक करण्याचा शेजारील काही पदार्थ विक्रेत्यांनी प्रयत्न केला; पण वाद मिटला नाही. अखेर दोघांना राजवाडा पोलिस ठाण्यात आणण्यात आले. दोघांनी एकमेकांविरोधात तक्रारी दिल्याने परस्परविरोधात अदखलपात्र गुन्हे दाखल करण्यात आले.